Chandani Chowk
Chandani Chowk Tendernama
पुणे

चांदणी चौकात पुढील 40 वर्षांचा विचार करून 'असा' बनविणार रस्ता

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढील चाळीस वर्षांचा विचार करून महामार्गाची रुंदी वाढविली जात आहे. एनडीए-पाषाण पूल पाडल्यानंतर त्याखालील महामार्ग जवळपास ३६ मीटर रुंदीचा होणार आहे. सध्या या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणारी व मुंबईहून पुण्याला येणारी अशा दोन लेन आहेत. रुंदीकरणात मात्र पुण्याहून-मुंबईला जाण्यासाठी ३, तर मुंबईहून पुण्याला येण्यासाठी ३ अशा एकूण सहा लेन तयार होणार आहेत. त्यामुळे पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

पूल पाडल्यानंतर रस्त्याच्या कडेचे मोठे खडक फोडण्याचे काम वेगात होईल. १५ दिवसांत खडक फोडून या मार्गाची रुंदी वाढवली जाईल. दरम्यान, हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे पुढचे १५ दिवस या ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागणार आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एनडीए-पाषाण पूल पाडण्याचे काम सुरू आहे. या पुलावर ड्रिलिंग केले जात आहे. हे काम आणखी दोन दिवस चालेल. त्यानंतर त्यात विस्फोटक ठेवण्याचे व त्यासाठी वायरिंगचे काम केले जाणार आहे. १८ सप्टेंबरला पूल पाडण्याचे नियोजन असले तरी वेळेबाबत अद्याप कोणतीही निश्चिती नाही. पावसामुळे या कामांना थोडा उशीर होण्याची शक्यता आहे.

सहा लेन, सेवारस्ते ठरणार महत्त्वाचे
एनडीए-पाषाण पुलाखाली सध्या दोन लेन अस्तित्वात आहेत. येथील महामार्गाची रुंदी वाढविण्यासाठी कडेचे खडक फोडण्यात येणार आहे. हे करत असताना दोन सेवारस्तेदेखील तयार केले जाईल. मात्र त्यासाठी किमान सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यात आधी पुलाच्या खालच्या महामार्गाचे काम केले जाणार आहे. १५ दिवसांच्या आत खडक फोडून हा मार्ग करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेवले आहे. त्याच्या आतच काम संपेल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पुढचे १५ दिवस वाहतूक कोंडी
सध्या पूल पाडण्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुलाच्या खालच्या रस्त्याची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. मात्र पूल पाडल्यावर हे काम वेगाने केले जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून येणारी वाहतूक वळवली जाणार आहे. या सगळ्या कामांसाठी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता धरून नियोजन केले जात आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणखी १५ दिवस कायम राहणार आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ३६ मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी पूल पाडल्यावर पुढच्या १५ दिवसांत खडक फोडले जातील. यामुळे वाहतुकीत बदल होणार असल्याने पुढील १५ दिवस वाहतूक कोंडी होणार आहे.

चौकातील पूल पाडल्यावर त्या खालील रस्त्याची रुंदी वाढवली जाणार आहे. सध्या १८ मीटरचा दोन लेनचा रस्ता पुढच्या काही दिवसांत सहा लेनचा होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.
- संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे