Road Tendernama
पुणे

Pimpri : मामुर्डी ते वाकड मुळा नदीवरील पुलापर्यंत रस्ते होणार रुंद, यामुळे वाहतूक...

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) :. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) हे सेवा रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेतले असून त्याने महामार्ग एकूण ८४ मीटर रुंद होणार आहे. त्यामुळे महामार्गावर होणाऱ्या कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून एनएच - ४८ मुंबई - बंगळुरू महामार्ग जातो. त्यालगत दोन्ही बाजूस सेवा रस्त्यांचा (सर्व्हिस रोड) विकास केला जाणार आहे. त्या दिशेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयने पाऊल टाकले आहे. हा महामार्ग पिंपरी - चिंचवड शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. या रस्त्यावरील शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग अरूंद असून सेवा रस्त्याचे काम अनेक ठिकाणी रेंगाळले आहे. महापालिका हद्दीतील सेवा रस्ते कागदावर आहेत. शिवाय, त्यांची बिकट अवस्था, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या, कमी उंचीचे व कमी रुंदीचे भुयारी मार्ग यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले आहेत. या रस्त्याबाबत अनेक नागरिकांच्याही तक्रारी होत्या. अखेर नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे.

सेवा रस्त्यांचा परिणाम

- वाढत्या वाहतूक समस्यांचे निराकरण होईल

- कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होईल

- रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होईल

- वाहतूक कोंडीतून सुटका होईल

सद्यःस्थिती व भविष्यात...

- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एनएच - ४८ महामार्गाच्या बाजूने सध्याचा रस्ता १२ मीटर रुंद आहे. आता आणखी १२ मीटर विस्तार करून त्याची रुंदी एकूण २४ मीटर केली जाणार

- एनएच - ४८ हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने पुनावळे, भूमकर चौक, हिंजवडी, बालेवाडी भागांत वेगाने वाढणाऱ्या रहदारीच्या दृष्टीने रस्त्याचा विकास अत्यंत महत्त्वाचा ठरणार

- महामार्ग आणि सेवा रस्त्यांसह एकूण कॅरेजवे ६० मीटर रुंद असून दोन्ही बाजूंना महापालिका नियोजनातील प्रत्येकी १२ मीटर रुंद विकास आराखड्यातील (डीपी) रस्ते आहेत.

- सध्याचे रस्ते व प्रस्तावित रस्त्यांमुळे एकूण रुंदी ८४ मीटर होणार

- मामुर्डी, किवळे, रावेत, वाकड, हिंजवडी, पिंपळे निलख या भागांतील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मदत होणार

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

- प्रकल्पासाठी ६०४.५९ कोटी रुपये अंदाजित खर्च

- रुंदीकरण आणि सुधारित सेवा रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होणार

- प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल

- रस्त्याच्या टिकाऊपणासाठी काँक्रीट, पदपथ करणार

- पाणी साचण्यापासून टाळण्यासाठी प्रगत निचरा प्रणालीचा वापर

- स्थानिक प्रवासी, व्यवसायांसाठी वाहतूक अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार

एनएच - ४८ हा महामार्ग पिंपरी - चिंचवडमधील महत्त्वाचा आहे. औद्योगीकरण व शहरीकरणामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नवीन सेवा रस्त्यांमुळे मुख्य महामार्गावरील गर्दी कमी होईल. वाहतूक व्यवस्थापन सुधारेल. स्थानिक प्रवासी आणि व्यवसायांसाठी सुलभ प्रवेश मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. शहराच्या दीर्घकालीन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तो महत्त्वाचा आहे.

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका