Road Tendernama
पुणे

सातारा-कागल रस्त्याचे काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ मध्ये कागल ते सातारा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे. हे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

कागल ते सातारा महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत सदस्य अतुल भोसले यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य दिलीप लांडे यांनीही सहभाग घेत उपप्रश्न उपस्थित केले.

उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, सातारा ते कागल दरम्यान काम कागल ते पेठ नाका आणि पेठ नाका ते शेंद्रे फाटा अशा दोन टप्प्यात होत आहे. या दोन्ही टप्प्यातील कामे व कराड शहरालगत उड्डाणपुलाचे काम निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात येईल. कागल ते पेठ नाका, पेठ नाका ते शेंद्रा फाटा हे दोन्ही टप्प्यातील रस्त्याचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

तसेच करार शहराजवळील उड्डाणपुलाचे काम ऑक्टोंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या रस्त्यावर काही अतिक्रमणे आहेत, ते काढण्यात येतील. तसेच काम सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सूचना देण्यात येतील.