पुणे (Pune) : मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारे व वाहतुकीसाठी धोकादायक असणारे औंधमधील विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.
औंधमधील ब्रेमेन चौक ते राजीव गांधी पूल या दरम्यानचा बहुतांश रस्ता ३६ मीटरचा झाला आहे. मात्र, औंध पोलिस चौकी व त्यासमोरील विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन कार्यालय व अन्य एक वास्तू रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत होती. संबंधित कार्यालयांमुळे रस्ता अरुंद होऊन तेथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने रस्त्यावरून जात असल्याने अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. संबंधित कार्यालयांमुळे वाहतुकीस निर्माण होणाऱ्या अडचणीबाबतचे प्रकाशित करून त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पोलिस प्रशासनाकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतरही संबंधित कार्यालय स्थलांतरित करण्याबाबत हालचाल होत नव्हती. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही पोलिस प्रशासन व राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर जुलै २०२४ या महिन्यात महापालिका व पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे हा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला होता. याच कालावधीत पोलिस आयुक्त कार्यालयाकडून पोलिस महासंचालक कार्यालयास पत्रव्यवहारही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी औंधमधील विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन कार्यालयाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. संबंधित कार्यालय स्थलांतरित करण्यासंदर्भात त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा केली.
विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन कार्यालय रस्ता रुंदीकरणामुळे स्थलांतरित करण्याचा विचार सुरू आहे. त्यासंदर्भात आम्ही नुकतीच पाहणी केली आहे. २००८पासून हा प्रश्न प्रलंबित आहेत. रस्ता रुंदीकरण पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यालय स्थलांतरित करण्याबाबतची चाचपणी करण्यात येत आहे.
- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त
पोलिसांचे कार्यालय वाहतुकीस अडथळा ठरत आहे. उर्वरित रस्ता ३६ मीटर रुंद करण्यात आला आहे. केवळ संबंधित कार्यालयाजवळील रस्ताच अरुंद आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरच मार्ग निघण्याची शक्यता आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका