Pune ZP
Pune ZP Tendernama
पुणे

ठेकेदारांनो सावधान! झेडपीचे ॲप 'असे' ठेवणार कामाच्या दर्जावर वॉच

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे जिल्हा परिषदेने (Pune Zilla Parishad) ठेकेदारांवर ‘वॉच’ (नियंत्रण) ठेवणारे मोबाईल ॲप (Mobile App) विकसित केले आहे. या ॲपमुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बसून जिल्ह्याच्या विविध भागात चालू असलेल्या विकासकामांवर नजर ठेवता येणार आहे. परिणामी झेडपी मुख्यालयातूनच एका क्लिकवर विकासकामांचा दर्जा समजू शकणार आहे. हे ॲप जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी जोडले जाणार असून, यामुळे झेडपीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंते हे कार्यालयात बसल्या बसल्या क्षणाक्षणाला कामाचा दर्जा तपासू शकणार आहेत.

मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या साहाय्याने जिल्हा परिषदेने हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. हे ॲप विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सोमवारी (ता. २५) कार्यान्वित करण्यात आले. या ॲपला झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप असे नाव देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य राहुल काळभोर, गामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या व्याख्याता डॉ. सोनाली घुले, भूषण जोशी आदी उपस्थित होते.

या ॲपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचे जिओ मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढून वेळेच्या बचतीबरोबर कामात गतिमानता येण्यास मदत होणार आहे. ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून नोंदणी करण्याचे बंधन सर्व ठेकेदारांवर घालण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील विकासकामे हे ठेकेदारी पद्धतीने ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि ग्रामपंचायतींना दिली जातात. या सर्वांना आता हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे.