Pune
Pune Tendernama
पुणे

Pune: PMRDAच्या 'या' निर्णयांमुळे वाहतूक सुरळीत होणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. खराब झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याबरोबरच वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेस वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, बाणेर व गणेशखिंड रस्त्यावर वाहने उभी करण्यास अथवा थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.

पुण्याचे पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी मागील आठवड्यात प्रत्यक्ष केलेल्या स्थळ पाहणी केली होती. यामध्ये ज्या ठिकाणी प्रत्यक्षात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू नाही अथवा काम सुरू करण्यास वेळ आहे, अशा ठिकाणचे बॅरीकेड्‌स रस्त्याच्या मध्यभागी लावल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. हे कारण पुढे करून महापालिकेने पीएमआरडीएला नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने प्राधिकरणाचे व पुणे मनपाच्या प्रकल्प विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

यादरम्यान प्राधिकरणामार्फत मेट्रो कंत्राटदारास दिलेल्या सूचनेनुसार मेट्रो कंत्राटदाराने बाणेर गाव हद्दीमध्ये ज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे अशा ठिकाणी किमान आवश्‍यक असलेल्या रुंदीस बॅरीकेड्‌स करून उर्वरित भागातील बॅरीकेड्‌स रस्त्याच्या मध्यभागी घेतले वा बॅरीकेड्‌सची रुंदी कमी केली आहे. बालेवाडी ते शिवाजीनगर या लांबीमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी नऊ मीटर रुंदीने बॅरीकेड्‌स लावले आहेत.

दरम्यान, करारनाम्यानुसार मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीने मेट्रो प्रकल्प ४० महिन्यांत पूर्ण करण्याचे बंधन आहे. त्यासाठी मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम करणेसाठी आवश्‍यक असलेली जागा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. ज्या ठिकाणी मेट्रोचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणचे बॅरीकेड्‌स किमान आवश्‍यक रुंदीपेक्षा अजून रस्त्याच्या मध्यभागी घेणे शक्‍य नसल्याचे प्राधिकरण व मेट्रो कंत्राटदार यांच्याकडून पुणे मनपाच्या उपस्थित अधिकारी यांना प्रत्यक्षात दाखविण्यात आली आहे, अशी माहिती पीएमआरडीएने दिली आहे.