Pune Mula-Mutha Rive
Pune Mula-Mutha Rive Tendernama
पुणे

Pune : पुणे देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर होणार; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुळा-मुठा नद्यांचे (Mula - Mutha Rivers) व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवनासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा कलमी उपाययोजना मांडली असून, पुढील काही वर्षात त्यांची पूर्तता केली जाईल. त्यामुळे स्वच्छ व सुंदर नदी बारामाही वाहती असेल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सादरीकरणात स्पष्ट केले.

‘धारा २०२३’ या परिषदेत समारोपाच्या दिवशी कुमार यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले, पुण्यामध्ये केंद्र सरकारच्या अनुदानाच्या मदतीने नदी शुद्धीकरण प्रकल्प राबवत आहोत. त्यासोबत ४४ किलोमीटरचा नदी काठ सुशोभित केला जाणार आहे. त्यातील नऊ किलोमीटरच्या टप्प्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारे एकाच वेळी दोन पातळ्यांवर महापालिकेचे काम सुरू आहे. पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. पुणे हे देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पुण्यासह अयोध्या, औरंगाबाद, ग्वाल्हेर आणि मुरादाबाद या शहरातील नदी सुधार प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आले.

पाच वर्षांत २५ अब्ज डॉलर्सचा पुरवठा
नदी सुधार प्रकल्पांना निधी उपलब्ध करण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक आणि केएफडब्ल्यू डेव्हलपमेंट बँकेच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. नदीकिनारी असणारी शहरे, क्षेत्रनिहाय निधीसाठी एकात्मिक उपाययोजना, संस्थात्मक पुनर्रचना आणि आर्थिक दृष्टिकोनातून प्रकल्प विकसित करणे या बाबींशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांवर मांडणी केली.

एडीबीचे उपसंचालक हो यून जिआंग म्हणाले, पुढील पाच वर्षांत भारतामध्ये २० ते २५ अब्ज डॉलर्सच्या वित्त पुरवठ्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यातील ४० टक्के निधी हा वातावरणीय बदलावरील उपायांसाठी आणि आपत्ती प्रतिबंधक सक्षमता निर्माण करण्यासाठी असेल.

सहा कलमी उपाययोजना...
१) नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नद्यांची स्वच्छता करणे
२) पुराचा धोका कमी करणे
३) नागरिकांना नदीकिनाऱ्यावर जाणे शक्य होईल अशी व्यवस्था निर्माण करणे
४) पाण्याचा पुनर्वापर
५) शहर आणि नदीतीराचा संबंध सुधारणे
६) अस्तित्वात असलेल्या वारसा वास्तू, मनोरंजन, धार्मिक, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम आणि परिसंस्था सुधारणे