Navale Bridge
Navale Bridge Tendernama
पुणे

PUNE: मोठ्या वाहनांसाठीचा स्वतंत्र ट्रॅक अपघात रोखणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान (Katraj New Tunnel To Navale Bridge) होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. नवीन कात्रज बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या वाहनांसाठी सात किलोमीटरचा स्वतंत्र ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

सरकारी विश्रामगृहात रस्ते सुरक्षासंदर्भात झालेल्या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी शहर आणि ग्रामीण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेले अपघात आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या वतीने सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. कात्रज बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर काही वाहनचालक उतारावर गाडी न्यूट्रल करतात. त्यामुळे ब्रेक लागणे बंद होऊन अपघात होत आहेत. त्यात बहुतांश वाहनचालक कर्नाटक, तामिळनाडूसह परराज्यांमधील आहेत. त्यामुळे उतारापूर्वी वाहनचालकांसाठी ट्रक, कार वाहनांची चिन्हे आणि वेगवेगळ्या भाषेत फलक लावण्यात येतील. चेक पोस्टवर सूचना देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यासोबतच नवले पुलावर पादचाऱ्यांसाठी स्काय वॉक उभारण्यात येणार आहे. महामार्गावर मोठ्या जाडीचे रम्बलर बसविण्यात येतील. हद्दीचा प्रश्न उपस्थित न करता अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे मार्गी लावावीत. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘यूजीसी’कडून चार वर्षांचा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यात तीन वर्षांचा शैक्षणिक आणि एक वर्षासाठी कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम असेल. हे नवीन शैक्षणिक धोरण जून २०२३ पासून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे एकाही प्राध्यापकाची नोकरी धोक्यात येणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांना पाण्याअभावी दुष्काळाचा सामना करावा लागतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या गावांवर दावा करणार असल्याचे वक्तव्य केले होते. या संदर्भात पाटील म्हणाले, जत तालुक्यासाठी टेंभू योजनेतून पाणी मंजूर झाले असून, तेथून तलाव आणि शेतापर्यंत पाणी देण्यास राज्य सरकार बांधील आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांमधील मराठी भाषिक तरुणांसाठी राज्य सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. त्याबाबत दोन दिवसांत घोषणा करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीत २०११ च्या लोकसंख्येनुसारच प्रभाग संख्या असेल. चार सदस्यांचा प्रभाग करण्याचे कारण नाही. परंतु किती सदस्यांचा प्रभाग असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही, असे त्यांनी सांगितले.