Bopodi
Bopodi Tendernama
पुणे

Pune : जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचा तिढा; महापालिकेची का होतेय फरफट?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (Old Mumbai Pune Highway) रस्ता रुंदीकरणासाठी लष्कराने महापालिकेस (PMC) जागा दिली. परंतु, संबंधित जागेच्या भाडेकरारावरील मालमत्तांचे मूल्यांकन करण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेस (PCMC) देण्यात आले आहे. मूल्यांकन प्रक्रिया झाल्यानंतर अडीच महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र या तीन किलोमीटरच्या परिसरातील मेट्रो स्थानक वगळता मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. तर महापालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक सव्वा दोन किलोमीटरची जागा लष्कराने महापालिकेला उपलब्ध करून दिली आहे. या रस्त्यासाठी आवश्‍यक जागेसह दहा एकर जागा लष्कराने महापालिकेस दिली आहे. तेथे आता ४२ मीटर रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.

दरम्यान, या जागेच्या मोबदल्यात तेवढ्याच किमतीच्या जागेची (इक्वल व्हॅल्यू लॅंड) मागणी लष्कराने महापालिकेस केली होती. त्यानुसार, महापालिकेने त्यांना सुमारे १०७ कोटी रुपये मूल्य असलेली येरवड्यातील जागा लष्कराला उपलब्ध करून दिली.

दरम्यान, लष्कराच्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने खडकी रेल्वे स्थानक परिसरातील जागा (सर्व्हे क्रमांक १०५) काही जणांना ९९ वर्षांच्या भाडेकराराने दिली होती. या जागांवर घरे, दुकाने, चित्रपटगृह उभारण्यात आले होते. संबंधित मालमत्ताधारकांच्या भाडेकराराची मुदत २०२७ मध्ये संपणार आहे. मात्र मेट्रो प्रकल्प व रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे त्यांना मुदतीपूर्वीच भाडेकराराने असलेली जागा सोडावी लागणार आहे.

त्यानुसार, लष्कराने संबंधित भाडेकरार संपवून महापालिकेस जागा मोकळी करून देणे, मालमत्ताधारकांच्या जागेचे मूल्यांकन करणे महापालिकेस अपेक्षित होते, प्रत्यक्षात तसे झाले नाही. याउलट ही जबाबदारी महापालिकेची असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र महापालिकेने जागा ताब्यात घेणारी संस्था असल्याने त्यांनाही मूल्यांकन त्रयस्थ संस्थेमार्फत करावे लागणार होते. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांनीही तांत्रिक कारणाने मुल्यांकनास नकार दिला.

अखेर महापालिकेने मूल्यांकन करण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिली आहे. त्यांच्याकडून मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालमत्ता महापालिका काढून टाकेल, त्यानंतर तेथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुल्यांकनानंतर महामेट्रो देणार पैसे

मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालमत्ताधारकांना पैसे देण्याचे काम महामेट्रो करणार आहे. त्यानुसार, महापालिका मूल्यांकन पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. मूल्यांकन, पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यास महापालिका तातडीने रस्त्याचे काम करणार आहे.

लष्कराच्या भाडेकरारावरील जागांच्या मुल्यांकनाची तांत्रिक प्रक्रिया झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मूल्यांकन केले जाईल. महामेट्रोकडून मालमत्ताधारकांचे पैसे दिले जातील. त्यानंतर महापालिका त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करेल.

- दिनकर गोंजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका