पुणे (Pune) : पुण्यातील लोकलना मुंबईसारखी तुडूंब गर्दी नसली तरी सकाळी व सायंकाळी धावणाऱ्या लोकलचे डबे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. अनेक प्रवाशांना ‘फूट बोर्ड’वर उभे राहून प्रवास करणे भाग पडते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने पावले टाकण्याची गरज आहे. सकाळची ८ वाजून २० मिनिटांची लोणावळा-पुणे व सायंकाळची ६ वाजून २ मिनिटांची पुणे-लोणावळा या दोन्ही लोकलना प्रचंड गर्दी असते. गर्दी वाढल्यानंतर अनेक प्रवाशांना डब्यात प्रवेश करणे अशक्य होते. त्यामुळे फूट बोर्डवर उभे राहून प्रवास करणारे काही जण ट्रॅकवर पडून जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. त्यामुळे प्रशासनाने डब्यांची संख्या वाढविणेही आवश्यक आहे.
काही प्रवासी डब्यात जागा असूनही ‘फूट बोर्ड’वर उभे राहतात. तर काही जणांना दारापाशी थांबणे अटळ बनते. त्यामुळे त्यांचा जीव सतत धोक्यात असतो. प्रवासी गाड्यांमध्ये आरक्षित डब्यांच्या तुलनेत जनरल डब्यातील बरेच प्रवासी ‘फूट बोर्ड’वर उभे राहूनच प्रवास करतात.
कमी खर्च, वेळेमुळे गर्दी
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी तसेच तिकिटाचा दर केवळ १५ रुपये आहे. त्यामुळे लोणावळा लोकलची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
तीन वर्षांत ९२२ मृत्यू
गेल्या तीन वर्षांत रेल्वे डब्यातून खाली पडणे, रूळ ओलांडताना दुर्घटना होणे अशा विविध कारणांमुळे पुणे विभागात ९२२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील लोकलना मुंबईप्रमाणे गर्दी नाही. ‘फूट बोर्ड’वर उभे राहून प्रवास करू नये अशी सूचना प्रवाशांना पूर्वीपासूनच दिली जात आहे. या व्यतिरिक्त रेल्वे बोर्डाचे जे आदेश येतील, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे
दृष्टिक्षेपात
- ६४ किलोमीटर ः पुणे-लोणावळा अंतर
- २३ ः स्थानके
- १ तास २० मिनिटे ः प्रवासाचा कालावधी
- १५ रुपये ः तिकीट दर
- १२ ः डबे
- ४० ः दिवसातील फेऱ्या
- ७० हजार ः दैनंदिन प्रवासी