pune Tendernama
पुणे

Pune: टाटा कंपनीला महापालिकेने का ठोठावला 15 लाखांचा दंड?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune): बालेवाडी हायस्ट्रीट (Balewadi Highstreet) समोरील मोकळ्या जागेत हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो (Hinjawadi Shivajinagar Metro) प्रकल्पाच्या उत्खननातून निघालेला सुमारे ६० ट्रक राडारोडा टाकण्यात आला आहे.

यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नसल्याने महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने टाटा (TaTa) प्रोजेक्ट कंपनीला थेट १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शहरात अवैधरीत्या राडारोडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या पाहणीत दोन डंपरमधून सुमारे ६० फेऱ्या करून हायस्ट्रीट परिसरात राडारोडा टाकल्याचे समोर आले. यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नव्हती.

या राडारोड्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाईचे पाऊल उचलले. प्रशासनाने प्रति फेरी २५ हजार रुपये याप्रमाणे ६० डंपरच्या फेऱ्यांसाठी १५ लाख रुपयांचा दंड टाटा प्रोजेक्ट कंपनीला ठोठावला आहे. त्याचबरोबर, राडारोडा तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

राडारोडा उचलला नाही तर, कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी ही नोटीस बजावली आहे.