पुणे, ता. १२ ः शहरातील रस्ते, सार्वजनिक जागा झाडून काढण्यासाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या कामासाठी ९ क्षेत्रीय कार्यालयात एक वर्ष मुदतीच्या टेंडर (Tender) काढल्या जाणार आहेत.
त्यासाठी पूर्वगणनपत्रक समितीने (इस्टिमेट कमिटी) मान्यता दिली. ठराविक ठेकेदारांसाठी टेंडरच्या अटी शर्ती बदलल्याने वादात सापडलेल्या टेंडर रद्द केल्यानंतर आता जुन्या अटी शर्तीनुसार ही टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पुणे शहरातील रस्ते, गल्लीबोळ झाडून काढण्यासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी टेंडर काढल्या जातात. यंदाच्या वर्षी या टेंडर काढताना पूर्वीच्या नियम व अटी बदलण्यात आल्या. नव्या नियम व अटीमध्ये टेंडर प्रसिद्ध होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवणे, टेंडर प्रसिद्ध होण्या पूर्वीच्या तारखेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, तसेच याच तारखेच्या आधी चॅम्पियन मशिन खरेदी केलेली असणे आवश्यक आहे.
यासह मनुष्यबळाऐवजी चौरस मीटरप्रमाणे या टेंडर काढल्या होत्या. त्यात प्रति चौरस मीटरसाठी ५९.४० रुपये इतक्या खर्चाचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. १४ क्षेत्रीय कार्यालयासाठी १४८ कोटीच्या टेंडर काढल्या होत्या. यात ठरावीक ठेकेदारांना पायघड्या घातल्या असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या टेंडर रद्द केल्या.
त्यामुळे आता शिवाजीनगर घोले रस्ता, औंध-बाणेर, कोथरूड बावधन, वारजे कर्वेनगर, सिंहगड रस्ता, वानवडी रामटेकडी, हडपसर मुंढवा, कोंढवा येवलेवाडी, बिबवेवाडी, कसबा पेठ विश्रामबाग वाडा या क्षेत्रीय कार्यालयांच्या झाडणकामाचा खर्च पूर्वगणनपत्रक समितीमध्ये मंजूर झाला आहे. त्यानुसार आता टेंडर प्रक्रिया सुरू होईल. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील टेंडरची मुदत डिसेंबर २०२५ पर्यंत आहे.
तर परिमंडळ एक मधील क्षेत्रीय कार्यालयांचे प्रस्ताव या बैठकीत आले नव्हते. त्यामुळे त्यांचा निर्णय झालेला नाही. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ठेकेदार नियुक्त केला जात नाही. त्यामुळे १५ पैकी १० क्षेत्रीय कार्यालयाच्या टेंडर काढल्या जाणार आहेत, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.