पुणे (Pune) : अहिल्यानगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रफळ चाळीस चौरस किलोमीटर इतके मोठे आहे. मात्र, खड्डे बुजवण्यासाठी एकच जुना रोडरोलर असून, त्याच्या ‘वेगामुळे’ तो डोकेदुखी बनला आहे. हा रोलर वापरून काम करताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. याचेच गाऱ्हाणे आज अधिकाऱ्यांनी आमदार बापू पठारे यांच्याकडे मांडले.
अहिल्यानगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक स्वच्छता, कचरा संकलन या खात्याशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता, आरोग्य निरीक्षक यांच्यासोबत आमदार बापू पठारे यांनी बैठक घेतली. बैठकीसाठी उपायुक्त राजीव नंदकर, सहाय्यक आयुक्त संजय पोळ आदी उपस्थित होते. त्या वेळी जुन्या रोडरोलरचा मुद्दा समोर आला.
अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाघोली, लोहगाव, धानोरी, खराडी, विमाननगर, वडगाव शेरी भागातील खड्डे बुजवण्याची नागरिक मागणी करतात. जुन्या रोडरोलरला एका जागेहून दुसऱ्या जागी जायला खूप वेळ लागतो. अनेकदा वाघोली आणि लोहगावपर्यंत हा रोलर पोहोचतच नाही. मध्येच बंद पडतो. कर्मचारी आणि यंत्रसामग्री विनाकारण रोलरची वाट पाहण्यात बसून राहते. यात वेळ जातो, अशी कैफियत काही कनिष्ठ अभियंत्यांनी मांडली.
अहिल्यानगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयासाठी मंजूर झालेला नवा रोडरोलर पुण्यातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाला वर्ग करण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. त्यानंतर नव्या रोडरोलरसाठी महापालिकेकडे पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल, असे उपायुक्त राजीव नंदकर यांनी सांगितले.
आमदार बापू पठारे म्हणाले की, अतिक्रमण विभागाला अतिरिक्त बिगारी, प्रत्येक प्रभागाला गाडी आणि क्रेन उपलब्ध करून देणे, क्षेत्रीय कार्यालयासाठी जेटिंग आणि ग्रॅब मशिन यांची संख्या वाढविणे, श्वान पथकाची स्वतंत्र गाडी, क्षेत्रीय कार्यालयाला नवा रोडरोलर आदींची तातडीने गरज असल्याने तशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.