पुणे (Pune) : दापोडीला जोडणाऱ्या पुलाशेजारील नदीपात्रात कचऱ्याचे ढिगारे टाकून ते पेटवून दिले जात आहेत. यामुळे वायू प्रदूषणाचा धोका वाढत आहे. अशा अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील मानवी आरोग्याला धोक्यात आले आहे.
पिंपळे गुरवमध्ये प्रवेश करण्यासाठी दापोडीला जोडणाऱ्या पुलावरून येतानाच हा प्रकार दिसून येत आहे. नदी किनाऱ्यावर आणि पुलाजवळ सतत विषारी धुराचे अस्तित्व जाणवते. नागरिकांना याचा त्रास होऊन श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे कचऱ्याचे ढिगारे अनेकदा सफाई कर्मचारी किंवा स्थानिक नागरिकांकडून पेटवले जातात. ज्यामुळे तासन्तास धुराचे लोट पसरून हवामानात विषारी घटक मिसळत आहेत.
कायद्यानुसार, उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायद्याने गुन्हा आहे. मात्र, या गंभीर कृत्यांकडे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष नाही. शिवाय, जनजागृतीदेखील केली जात नसल्याचा आरोप होत आहे.
कचरा जाळण्याचे दुष्परिणाम
१. श्वसनाचे आजार वाढतात
२. डोळ्यांची जळजळ आणि इतर अस्वस्थता वाढते.
३. सतत विषारी धुरामुळे परिसरात राहणे त्रासदायक
४. कचरा जाळल्यामुळे नदीतील जैवविविधतेला धोका
उपाययोजना
१. कचरा जाळण्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी.
२. नदी किनाऱ्याजवळ आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी योग्य जागांची व्यवस्था करावी.
३. कचरा व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आवश्यक
४. पिंपळे गुरव परिसरात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची विल्हेवाट लावावी.
५. कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार दंड आणि कारवाई केली जावी.
पिंपळे गुरव परिसरात कचरा जाळला जात असलेल्या ठिकाणी कर्मचारी पाठवून आग नियंत्रणात आणली व तेथील स्वच्छता केली. जे कोणी हे कृत्य करत असतील, त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल.
- रश्मी तुंडलवार, आरोग्य निरीक्षक, ‘ड’ प्रभाग.
नदीपात्रालगत कचरा जाळणाऱ्यांकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष लक्ष ठेवावे. येथे साचणारा कचरा वेळेत उचलला पाहिजे. तसेच कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
- देविदास राजपूत, स्थानिक नागरिक