Pune City Tendernama
पुणे

Pune : पुण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामेट्रोने काय केली तयारी?

PMRDA : पुणे शहरासह जिल्ह्याचा वाहतूक आराखडा यापूर्वी ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आला होता. त्यात ‘महामेट्रो’कडून सुधारणा करून हा सुधारित आराखडा तयार केला.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पुणे महानगर क्षेत्रातील (PMR Region) वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘बीआरटी’, मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण यांसह विविध उपयोजना सुचविणारा सुमारे एक लाख २६ हजार कोटी रुपयांचा आराखडा ‘महामेट्रो’कडून तयार करण्यात आला आहे.

दोन्ही महापालिकांसह जिल्ह्याच्या सुमारे दोन हजार ५० चौरस किलोमीटर परिसरात पुढील ३० वर्षांसाठींचा हा एकात्मिक वाहतूक आराखडा’ ‘महामेट्रो’कडून गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या आराखड्याची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली.

पुणे शहरासह जिल्ह्याचा वाहतूक आराखडा यापूर्वी ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आला होता. त्यात ‘महामेट्रो’कडून सुधारणा करून हा सुधारित आराखडा तयार केला. त्यात नव्याने २७६ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका, सहा नवीन ‘बीआरटी’ मार्गाचे जाळे प्रस्तावित करण्यात आले.

पुणे शहरातील वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या मार्गाचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय ते येवलेवाडी विद्यापीठ चौक ते देहू रोड, खराडी ते खडकवासला, निगडी ते चाकण, हडपसर ते सासवड रस्ता, हडपसर ते लोणी काळभोर असा १४८ किलोमीटर मेट्रोमार्ग प्रस्तावित केले आहे.

याशिवाय जिल्हा न्यायालय ते आळंदी, वाकड चौक ते शेवाळेवाडी, ‘एचसीटीएमआर’ ते ‘पीसीएमसी’, ‘एचसीटीएमआर’ ते पुणे महापालिका या १२८ किलोमीटर असे सुमारे २७६ किलोमीटरचे मार्ग प्रस्तावित आहेत.

पुणे शहरातील लोकसंख्या विचारात घेतली, तर ‘पीएमपी’ची प्रवासी संख्या केवळ १० टक्के इतकीच आहे. ती ६० टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने आराखड्यात नियोजन करण्यात आले. त्यानुसार सध्या सहा हजार बससंख्या अपेक्षित असून, त्यात एक हजार ६२५ ई-बस असाव्यात. तर २०५४ पर्यंत टप्याटप्प्याने ती ११ हजार ५६४ करावी लागणार आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

‘पीएमपी’चे नवीन १८ बसमार्ग...

अहवालात ‘पीएमपी’चे ६४१ किलोमीटर लांबीचे नवीन १८ बसमार्ग सुचविण्यात आले आहेत. तर १० टर्मिनल, ‘पीएमआरडीए’च्या रावेत ते राजगुरुनगर, गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी, रावेत ते तळेगाव दाभाडे, चांदणी चौक ते हिंजवडी या ११७ किलोमीटर लांबीच्या मार्गाबरोबर लोणीकाळभोर ते केडगाव, भूमकर चौक ते चिंचवड चौक या ४६ किलोमीटर लांबीचे ‘बीआरटी’ मार्ग प्रस्तावित करण्यात आले.