Pune City
Pune City Tendernama
पुणे

Pune : ऐन गणेशोत्सवात पुण्यातील 'या' भागात पाणीटंचाई; नागरिक हैराण

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पाणी कपात नसताना उत्सव काळात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने कोथरूड परिसरातील महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

कोथरूडमधील शास्त्रीनगर, नव एकता कॉलनी, हमराज गणपती परिसर, लाल बहादूर शास्त्री कॉलनी आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रार करूनही सुधारणा होत नसल्याने उत्सवकाळात मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आणू नका, अशा संतप्त सुरात महिलांनी इशारा दिला आहे.

स्थानिक रहिवासी नामदेव ओव्हाळ म्हणाले की, संपूर्ण जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पाइपमध्ये कचरा आढळला होता. तो साफ केल्यावर पाणीपुरवठा सुधारला होता, मात्र मागील आठवड्यापासून पुन्हा कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागते. प्रामाणिकपणे मिळकत कर, पाणीपट्टी वेळेत भरूनही महापालिका प्रशासन पायाभूत सुविधा पुरविण्यामध्ये कमी पडत आहे.

किशोर मारणे यांनी सांगितले की, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सर्रास नळाला विद्युत पंप लावून पाणी उपसा सुरू असतो. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पंप लावल्याने इतरांना अतिशय कमी दाबाने पाणी मिळते. महापालिका कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी करून असे पंप जप्त करावेत. पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी, तसेच पाणी गळती रोखल्यास काही प्रमाणात पुरवठा सुरळीत होईल, असे वाटते.

गणेशोत्सवामुळे पाहुण्यांची घरी वर्दळ वाढली आहे. त्यातच पाण्यासाठी धावाधाव करावी लागत असल्याने महिलांचा ताण वाढला आहे. तक्रार केली की तेवढ्यापुरता पाणीपुरवठा सुरळीत केला जातो. कोथरूड भागाला मिळणारे पाणी बावधन, बाणेर, पाषाणला चालले आहे. आम्हाला मात्र तक्रार करूनही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. कित्येक महिन्यांपासून आम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कोथरूडला कोणी वाली आहे की नाही?

- स्मिता कुंबरे, स्थानिक रहिवासी

शास्त्रीनगर परिसरातील जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खराब झाला असल्याने पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आठवड्याभरात फरक दिसेल.

- नरेंद्र परदेशी, कनिष्ठ अभियंता, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय