Wagholi
Wagholi Tendernama
पुणे

Pune: वाघोली ते पिंपरी-चिंचवड अंतर कमी होणार! असा आहे मेगा प्लॅन..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चऱ्होलीतून वाघोलीला (Wagholi) जाण्यासाठी सध्या तीन मार्ग आहेत. त्याद्वारे दोन्ही गावांतील किमान अंतर १६.५ आणि कमाल अंतर २७ किलोमीटर आहे. त्यामुळे वेळ व पैसा अधिक लागत आहे. आता पुणे महापालिकेने (PMC) हाती घेतलेल्या नवीन रस्त्यामुळे दोन्ही गावे अवघी ५.७ किलोमीटरवर येणार असून, रहदारीही सुसाट होईल.

हा रस्ता आठ पदरी नियोजित असून कामाचे आदेश दिले आहेत. खासगी भागीदारी तत्त्वावर (PPP) रस्ता उभारणीसाठी कंत्राटदार कंपनीला तीन वर्षांची मुदत दिली आहे. या रस्त्यामुळे चऱ्होलीसह आळंदी, देहू, भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड, चाकण ही गावे वाघोलीच्या अर्थात नगर रस्त्याच्या अगदी जवळ येणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटणार आहे.

पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून ते पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील चऱ्होलीच्या हद्दीपर्यंत रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे पीएमआरडीएचा रिंगरोड, वडगाव शिंदे व लोहगाव या गावांचीही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

पुणे महापालिकेतर्फे हा रस्ता विकसित केला जाणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरून येरवडामार्गे पिंपरी-चिंचवड किंवा मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पुण्याऐवजी थेट मार्ग मिळणार आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंगरोडला कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

सद्यःस्थिती...

नगर रस्त्यामार्गे येणारी वाहने येरवडा, विश्रांतवाडी किंवा खडकी, बोपोडीमार्गे पिंपरी-चिंचवडला जातात. यामध्ये ट्रक, प्रवासी बस, कंटेनर अशा अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे अनेकदा कोंडी होते. शिवाय, अंतरही जास्त आहे. त्यामुळे वेळ, इंधन व खर्च अधिक लागत आहे.

भविष्यात...

पुण्यातील खराडी, येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, बोपोडी आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, दिघी, भोसरीत होणारी वाहतूक कोंडी टळेल. पिंपरी, चिंचवड, निगडी, चऱ्होली, आळंदी या गावांचे वाघोलीशी असलेले सध्याचे अंतर कमी होईल. वेळ, इंधन व पैशांची बचत होईल.

हे रस्ते जोडणार

- आळंदी-पुणे पालखी मार्ग

- पुणे-नाशिक महामार्ग

- मुंबई-पुणे महामार्ग

- मुंबई-बंगळूर महामार्ग

असे आहे नियोजन

- दोन्ही बाजूला सेवारस्ते

- रस्त्यालगत पावसाळी गटारे

- प्रकाश व्यवस्थेसाठी पथदिवे

- वाहतूक नियंत्रक दिवे

सध्याचे चऱ्होली-वाघोली अंतर (किलोमीटर)

लोहगाव मार्गे ः १४.६

धानोरी मार्गे ः १६.५

विश्रांतवाडी मार्गे ः २०

मरकळ, तुळापूर मार्गे ः २७

नगर रस्त्यावरील वाघोली ते पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चऱ्होली बुद्रूकच्या हद्दीपर्यंत पीपीपी तत्त्वावर क्रेडिट नोटच्या माध्यमातून खासगी कंत्राटदारातर्फे रस्ता विकसित केला जाणार आहे. आठ पदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता असेल. पहिल्या टप्प्यात एक सेवा रस्ता केला जाणार आहे. रस्त्यासाठी जमीन ताब्यात नसून, कंत्राटदार कंपनीने एफएसआय, टीडीआरच्या माध्यमातून जमीन घेऊन रस्ता करायचा आहे. रस्ता तयार होईल, त्याप्रमाणात कंत्राटदाराला रक्कम दिली जाणार आहे.

- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका