Pune City
Pune City Tendernama
पुणे

Pune: विद्यापीठ चौकातील कोंडी फूटणार; ...असा आहे नवा मार्ग

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्यावर (Ganeshkhind Road) मेट्रोचे काम सुरू असल्याने या भागात प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. त्यामुळे आनंद ऋषीजी चौकातील (पुणे विद्यापीठ चौक) वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (SPPU) वळवली जाणार आहे.

त्यासाठी विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार केला जाणार आहे. याला आज पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान हा रस्ता तयार होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे काम सुरू आहे. कामाला गती आलेली असताना गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाण पूल उभारला जाणार आहे. हा पूल पुढील एका वर्षभरात बांधून तयार करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी प्रयत्न सुरू असले तरी तांत्रिक पडताळणीनंतरच त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. मात्र विद्यापीठ चौक व त्याच्या परिसरात सुरू असलेल्या कामामुळे पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, औंध रस्ता या भागात वाहतूक कोंडी वाढलेली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

विद्यापीठ चौकातील कोंडी कमी करण्यासाठी विद्यापीठातून वाहतूक वळविल्यास दिलासा मिळेल, अशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार पुणे महापालिकेने विद्यापीठ प्रशासनाला दोन महिन्यांपूर्वी पत्र पाठवले होते. त्यानुसार आज पुम्टाच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘विद्यापीठ प्रशासनाने आतून रस्ता तयार करण्यास परवानगी दिली आहे. तसेच याबाबत पुम्टाच्या बैठकीतही निर्णय झाला आहे. त्यानुसार गुरुवारी पाहणी करून रस्त्याचे काम लगेच सुरू होईल. यासाठी १५ दिवस लागणार आहेत. हा रस्ता झाल्यानंतर विद्यापीठ चौकातील कोंडी काही प्रमाणात कमी होईल.’’

यासाठी नवीन रस्ता आवश्‍यक
- विद्यापीठ चौकात सर्वांत जास्त वाहने एकत्र येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते
- पाषाण व बाणेरवरून विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग नाही.
- औंधकडून येणाऱ्या वाहनांसाठी विद्यापीठातून पर्यायी मार्ग दिल्यास चौकातील कोंडी काही प्रमाणात कमी होईल
- दुचाकी, चारचाकी, तीनचाकी या हलक्या वाहनांसाठी विद्यापीठातील रस्ता खुला असेल
- चतुःश्रुंगी पोलिस ठाणे गेट ते मुख्यगेटपर्यंत रस्ता तयार आहे.
- मुख्यगेट ते वैकुंठ मेहता यादरम्यान १७५ मीटर लांबीचा आणि ६ मीटर रुंद रस्ता विद्यापीठाच्या आतून तयार केला जाईल.

सामाजिक विषयांसाठी विद्यापीठ नेहमीच पुणेकरांसोबत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी निश्‍चितच आम्ही दोन पावले पुढे येऊ. महापालिकेने विद्यापीठातील रस्ता सार्वजनिक वापरासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार परवानगी दिली आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ