PMC Pune
PMC Pune Tendernama
पुणे

Pune : पुण्याच्या उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका जोडणार 'या' 7 मिसिंग लिंक

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : उपनगरातील अर्धवट रस्ते एकमेकांना जोडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात सात मिसिंग लिंकचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील चार रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

महापालिका प्रशासनाने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन रस्त्यांसह भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्यांचा अभ्यास केला होता. यामध्ये ५२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सुमारे ७२० तुकडे शोधण्यात आले होते. या रस्त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्यातील ३८ रस्ते हे १०० मीटर ते अडीच किलोमीटर लांबीपर्यंतचे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे रस्ते प्राधान्याने करण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये अवघ्या १००, २०० मीटरचा रस्ता नसल्याने वाहन चालकांना मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने पहिल्या टप्प्यात सात रस्त्यांची निवड केली. या रस्त्यांची कामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार होती. पण, भूसंपादनातील अडचणींमुळे कामे वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाहीत, असे बैठकीत सांगण्यात आले.

दरम्यान, सातपैकी चार रस्त्यांची कामे प्रत्यक्ष काम सुरू आहेत, उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

हे आहेत सात रस्ते

- सिंबायोसिस ते विमाननगर

- कोद्रे फॉर्म ते प्रयेजा सिटी सिंहगड रस्ता

- विमाननगर सर्वे क्रमांक २३३

- नवले पूल ते भूमकर चौक

- २३५० विमानतळ रस्ता ते विमाननगर

- काळेपडळ ते रवी पार्क

- व्ह्युम फॅक्टरी ते पासलकर चौक