Golf Club Square
Golf Club Square Tendernama
पुणे

PUNE: 'या' पुलाचे लवकरच उद्घाटन; गोल्फ क्लब चौकातील कोंडी फूटणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम संपण्यास अखेर 'जी २०'च्या मुहूर्ताची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सहा महिन्यांची दिलेली मुदतवाढ उलटून गेली तरीही अद्याप उड्डाणपुलावर डांबरीकरण व रंगरंगोटीची कामे शिल्लक आहेतच. आता जानेवारी महिन्यात 'जी २०' परिषद होणार असल्याने त्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

येरवडा भागातून संगमवाडीकडे, तसेच पुणे शहरातून विमानतळाकडे आणि नगर रस्त्याच्या दिशेने जाण्यासाठी व विमानतळ, विमाननगर व नगर रस्त्याने येणारे नागरिक पुण्यात येण्यासाठी गोल्फ क्लब चौकाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. पण या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या भागातील वाहतूक ठप्प होत होती. तसेच अनेकदा पुण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री आदी व्हीआयपी व्यक्तींचा या रस्त्यावरून प्रवास असेल, तर चौकातील इतर रस्त्यावरची वाहतूक थांबवावी लागते. त्यामुळेही या भागात कोंडी होते. त्यामुळे गोल्फ क्लब चौकात उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला.

या कामासाठी ३१ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करून सप्टेंबर २०१९ मध्ये या पुलाचे काम सुरू केले. या भागातील झोपडपट्टीतील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणार असल्याने त्यांनी पुलाच्या खालून पादचारी मार्गाची मागणी केली होती, त्यानुसार हा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. हे काम ३० महिन्यांत म्हणजे एप्रिल २०२२ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. पण कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. सप्टेंबरमध्ये काम पूर्ण होणे आवश्‍यक होते, पण डिसेंबर महिना अर्धा संपून गेला तरीही काम सुरूच आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर या चौकातील ७० टक्के वाहतूक कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. या पुलाचे स्थापत्यविषयक सर्व काम पूर्ण झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरण, सुरक्षेसाठी उपाययोजना, रंगरंगोटी ही कामे राहिली आहेत. जानेवारी महिन्यात ‘जी २०’ परिषदेच्या बैठका होणार आहेत. या वेळी ३६ देशांचे सुमारे २५० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्याचे सुशोभीकरण, दुरुस्ती, स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन ही कामे ५ जानेवारीपूर्वी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा लागणार आहे.

‘जी २०’ परिषदेनिमित्त शहरातील सुशोभीकरण व इतर सर्व कामे ५ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपुलही त्यापूर्वी सुरू केला जाणार आहे. उर्वरित कामे तातडीने संपविण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांनाही सिग्नलवर थांबण्याची गरज पडणार नाही.
- विक्रमकुमार, आयुक्त, महापालिका