पुणे (Pune) : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बालेवाडी कस्पटे वस्ती चौक पूल बांधला. मात्र पूल बांधण्यापूर्वी जोडरस्त्यांसाठीची जागाच महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
आता तरी महापालिकेने संबंधित जागामालकांच्या बैठका घेऊन आपल्या अधिकारांचा वापर करून जोडरस्त्यांसाठी जागा मिळवावी; अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावरच महापालिका जलदगतीने हालचाल करणार का? यासारखे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.
बालेवाडी कस्पटे वस्ती चौक पूल तयार होऊन तीन-चार वर्षे उलटली. मात्र पुणे महापालिकेच्या हद्दीतील पुलाजवळील २०० मीटर जागा महापालिकेला अजूनही न मिळाल्यामुळे हा पूल वापराविना पडून आहे. त्याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
वाकडला जाण्यासाठी आम्हाला बालेवाडीतील महामार्गावरून दररोज प्रवास करावा लागतो. भरधाव व अवजड वाहनांमुळे जीव मुठीत घेऊन आम्ही प्रवास करतो. कोट्यवधी रुपये खर्च करून पूल बांधला, मग पूल बांधण्यापूर्वीच जोडरस्त्यासाठी महापालिकेने जागा ताब्यात का नाही घेतली.
- केतन वाघमारे
पूल तयार असूनही तो वापरात न आणणे म्हणजे लाखो लोकांची अडवणूक करण्याचा प्रकार आहे. महापालिकेकडे भूसंपादनाची प्रक्रिया सक्तीने करण्याचेही अधिकार आहेत किंवा न्यायालयीन यंत्रणादेखील आहे. त्याचा वापर करून भूसंपादन करण्याबरोबरच तातडीने पूल सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत.
- अश्विनी काळोखे
बालेवाडी कस्पटे वस्ती पुलाचे काम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी खुला होत नाही. त्यामुळे जागामालकांचे नेमके म्हणणे काय आहे, हे पाहिले पाहिजे. राजकीय व्यक्तींची मदत घेऊन तत्काळ तोडगा काढला पाहीजे.
- एक नागरिक
नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे. आता केवळ २०० मीटर जागा न मिळाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता रस्त्यासाठी कार्यवाही केली पाहिजे.
- विजयकुमार मर्लेचा
जागेसाठी पाठपुरावा सुरू ः आयुक्त
या नवीन पुलाच्या जोडरस्त्यांसाठीची जागा ताब्यात आलेली नाही. महापालिकेकडून संबंधित जागामालकांकडे पाठपुरावा सुरू आहे. एका ठिकाणी आखणी चुकली आहे, त्यावरदेखील सध्या काम सुरू आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.