PMC
PMC Tendernama
पुणे

Pune: 'ते' आले, त्यांनी पाहिले अन् अधिकाऱ्यांना झापझाप झापले!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील (Pune City) नाले सफाई केली जात असताना आत्तापर्यंत केवळ ४५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मे महिना अखेरपर्यंत कामे पूर्ण करायची असल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शहरातील विविध ठिकाणांवर पाहणी केली.

अनेक ठिकाणी समाधानकारक कामे न दिसल्याने ठेकेदार स्लो काम का करत आहे, व्यवस्थित खोलीकरण का केले जात नाही? असा प्रश्‍न करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. ही सर्व कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

मंगळवार पेठेत जन्म मृत्यू दाखला कार्यालयाच्या मागच्या बाजूपासून आयुक्तांनी नाले सफाईची पाहणी सुरू केली. तेथून वैकुंठ स्मशानभूमी, फरशी पूल, गजानन महाराज मंदिर, अरणेश्‍वर मंदिर, के. के. मार्केट, लेकटाऊन, दोन्ही कात्रज तलाव, येवलेवाडी भैरोबानाला, कोंढवा स्मशानभूमी, आईमाता मंदिर बिबवेवाडी, मुकुंदनगर नाला, टिंबर मार्केट, लिंगायत स्मशानभूमी भवानी पेठ, घसेटी पूल, अल्पना टॉकीज या भागात या भागात पाहणी केली.

जलपर्णीवरून झापले

कात्रज तलावातील जलपर्णी काढण्यासाठी टेंडर काढलेली आहेत. पण जलपर्णी काढलेली दिसली नाही, त्यामुळे आयुक्तांनी त्यावरून अधिकाऱ्यांना जाब विचारला. जलपर्णीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आले. तसेच नाल्यावरील अतिक्रमण, गणेश पेठेतील मासळी बाजार येथे व्यावसायिकांकडून ओला कचरा टाकला जात असल्याने तेथे कायमस्वरूपी गस्ती पथक नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नाले सफाई, अतिक्रमण, जलपर्णीच्या कामावरून असमाधान असल्याने अधिकाऱ्यांना चागंलेच फैलावर घेतले.

शहरात नालेसफाई सुरू झाली असून, आत्तापर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षी जी ठिकाणे धोकादायक होती, तेथे पाहणी करण्यात आली असून, आणखी चांगल्या पद्धतीने कामे करा, पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असे आदेश दिले आहेत. १५ दिवसानंतर पुन्हा एकदा पाहणी करणार आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

आयुक्तांनी नाले सफाईसंदर्भात पाहणी केल्याचे समजले. २०१९च्या घटनेचे आम्ही साक्षीदार असल्याने आयुक्त येणार आहेत हे माहीत असते तर त्यांना आम्ही थेट आमच्या अडचणी सांगितल्या असत्या. मात्र, अधिकाऱ्यांकडून याची कल्पनाही देण्यात आली नाही. गुजर-निंबाळकरवाडी परिसरात अनेक ठिकाणी सफाई बाकी आहे.

- दीपक गुजर, गुजर-निंबाळकरवाडी