Flyover
Flyover Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील 'या' उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कोरेगाव पार्क येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शहराच्या दोन भागांना जोडणाऱ्या या पुलाचे काम सुरू करण्यापुर्वी वाहतूक वळवणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक शाखेने निर्णय घेतल्यास पुढील आठवड्यापासून पुलाचे काम सुरू करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दर्शवली आहे.

सध्या रेल्वे मार्गावरील साधू वासवानी उड्डाणपूल कोरेगाव पार्क ते छावणी परिषद (नवीन सर्किट हाउस) या दोन भागांना जोडतो. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने त्यावरील जड वाहतूक गेल्या वर्षीच बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी चारपदरी पूल बांधण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन ८३ कोटी रुपये खर्च करणार आहे. पुलाच्या कामासाठी टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

महापालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात या पुलासाठी २० कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे. उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात पुणे महानगर परिवहन नियोजन समितीच्या (पुम्टा) बैठकीतही चर्चा झालेली आहे. संबंधित पुलामुळे नवीन सर्किट हाऊससमोरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.

नियोजित उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

- उड्डाणपुलासाठी होणारा खर्च - ८३ कोटी रुपये

- महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतूद - २० कोटी

- प्रस्तावित पुलाची लांबी - ६४० मीटर

- पुलाची एकूण रुंदी - १७.१५०

- पुलाची उंची - ६.९०

उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी वाहतूक वळवावी, अशी मागणी वाहतूक पोलिसांकडे केली आहे. पुढील आठवड्यात त्यांचा निर्णय येण्याची शक्‍यता आहे. आठवडाभरानंतरही या कामाला सुरवात होऊ शकते.

- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, महापालिका