Pune Univercity Chowk
Pune Univercity Chowk Tendernama
पुणे

Pune: विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामात पालिकेचाच खोडा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेकडून (PMC) विद्यापीठ चौकातील (आचार्य आनंदऋषी चौक) जलवाहिनी हलविण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चौकात (Pune University Circle) पुलाचे काम अद्यापही सुरू होऊ शकत नाही. मात्र, चौकात पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी गणेशखिंड रस्त्यासह अन्य रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासह रुंदीकरण तातडीने करावे, असा निर्णय महापालिका आणि PMRDA यांच्यात झालेल्या एकत्रित बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

चांदणी चौक येथील उड्डाणपूल पाडल्यानंतर आणि पुढील आठ दिवसांत अतिरिक्त दोन लेनचे काम पूर्ण केल्यानंतर पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सहा ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. पूल पाडल्यानंतरही चांदणी चौकातील अतिरिक्त दोन लेनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु, पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

या चौकातील मॉडर्न हायस्कूल येथील एक हजार २०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी हलविण्याचे या कालवधीत पूर्ण होणे अपेक्षित होते. ते अद्यापही झालेले नाही. दरम्यानच्या कालवधीत ‘पीएमआरडीए’ने ई-स्क्वेअरपासून विद्यापीठ चौकाच्या दिशेने बॅरिकेडिंग करून जलवाहिनीचे काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये मॉडर्न हायस्कूल जवळील जलवाहिनी हलविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे.

पुलाच्या कामाच्यावेळी वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करावी. त्याचबरोबरच सायकल ट्रॅक काढून दोन मीटरने रस्त्यांची रुंदी वाढवावी, आदी कामे महापालिकेने तातडीने पूर्ण करावीत, असे या बैठकीत ठरले. यावरून महापालिकेकडून दिलेल्या वेळेत कामे पूर्ण न केल्यामुळे चौकात पुलाचे काम सध्यातरी सुरू होऊ शकत नसल्याचे समोर आले आहे.