Parking Plaza
Parking Plaza Tendernama
पुणे

Pune : ..तर पुण्यातील वाहनतळांच्या ठेकेदारांना घरी बसविणार! पालिका का झाली कठोर?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहनतळांवर (Parking Plaza) ठेकेदाराच्या (Contractors) कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची होणारी लूट, दमदाटी आणि धमक्‍यांच्या प्रकारांना आता महापालिका (PMC) चाप लावणार आहे. दरपत्रक, संपर्क क्रमांक, संगणकीकृत पावती यासारख्या सुधारणा सक्तीच्या करण्याबरोबरच नागरिकांशी गैरवर्तन केल्यास ठेकेदारांना घरी बसविण्याची तयारी महापालिका करत आहे.

हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ, सतीश मिसाळ वाहनतळ, जयगणेश वाहनतळ (जोगेश्‍वरी लेन), शिवाजीराव आढाव वाहनतळ, हरिभाऊ साने वाहनतळ यासह वेगवेगळ्या भागांतील महापालिकेच्या वाहनतळांवर नागरिकांकडून जादा पैसे उकळले जातात. तसेच तेथील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी गैरवर्तन करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

विशेषतः हुतात्मा बाबू गेनू वाहनतळावर नागरिकांना सर्वाधिक वाईट अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी संबंधित प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

महापालिकेच्या सूचना

- वाहनतळांवर दर्शनी भागात पार्किंगचे दरपत्रक, नागरिकांना तक्रार करण्यासाठी ईमेल आयडी, संपर्क क्रमांक ठेवणे सक्तीचे

- जादा दर आकारणे किंवा नागरिकांशी गैरवर्तन करण्याचा प्रकार पहिल्यांदा घडल्यास तीन हजार रुपये, दुसऱ्यांदा घडल्यास पाच हजार रुपये आणि तिसऱ्यांदा घडल्यास करार रद्द करणे

- ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाच्या कनिष्ठ अभियंता श्‍वेतांबरी निकते यांनी सांगितले.

अधिकारी ठेवणार विशेष लक्ष

वाहनतळावर नागरिकांना येणारे वाईट अनुभव व गैरप्रकार थांबविण्यासाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी वाहनतळाच्या ठिकाणी सातत्याने पाहणी करणार आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणे वाहनतळावरील अनुभव घेणार आहेत. नागरिकांना वाईट अनुभव येत असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

अशा असतील वाहनतळावरील सुधारणा

- सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे बंधनकारक

- नागरिकांना संगणकीकृत पावती द्यावी

- पार्किंगचे दरपत्रक, ईमेल, संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावणे

- जादा दर आकारणे, गैरप्रकार घडल्यास नागरिक थेट तक्रार करू शकणार

महापालिकेच्या वाहनतळावर दरफलक तत्काळ लावण्यास सांगितले आहेत. नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल.

- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), महापालिका