Sinhgad Road
Sinhgad Road  Tendernama
पुणे

Pune : सिंहगड रोडची कोंडी फुटणार; ...असा असेल नवा पर्यायी रस्त्याचा मार्ग!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या आणि त्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या पर्यायी रस्त्यांच्या कामांना महापालिकेने (PMC) वेग दिला आहे. शहरातील ३३ पर्यायी रस्त्यांपैकी सहा रस्त्यांच्या जागा ताब्यात आल्या आहेत. लोहगाव येथील पर्यायी रिंगरोडच्या कामासाठी टेंडर काढण्यात आल्या आहेत, तर उर्वरित रस्त्यांची कामेही लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे.

नवले पुलाच्या परिसरात सतत अपघात होत आहेत, मात्र तेथील सेवा रस्त्यासाठीची जागा महापालिकेला अजूनही मिळालेली नाही. परिणामी वाहनचालकांना बाह्यवळण महामार्गाचा वापर करावा लागत आहे. दरम्यान, महापालिकेने नवले पूल ते भुमकर चौक असा कमी रुंदीचा पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा रस्ता सहा मीटर रुंदीचा असेल. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवले पुलावर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होईल. याबरोबरच अन्य पाच ठिकाणच्या पर्यायी रस्त्यांच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत.

असे होणार पर्यायी रस्ते

- सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून इंडियन ह्यूम पाइप ते गंगा चौक रस्ता होणार, जो पुढे दुधाणे लॉन्स येथील प्रस्तावित पुलाला जोडला जाणार

- ५०९ चौक ते लोहगाव रस्ता पूर्ण झाल्यावर लोहगावला जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध होणार

- मगरपट्टा ते हनीवेल या रस्त्याचे काम झाल्यानंतर औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार

- काळेपडळ (हांडेवाडी) ते रवी पार्क सोसायटी हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर ससाणेनगर रेल्वे पुलाकडे जाण्यासाठी पर्याय मिळणार

- विमाननगर ते विमानतळ या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता होणार

मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या व पर्यायी रस्त्यांसाठीच्या काही जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. लोहगाव रिंगरोडसाठीच्या टेंडर काढण्यात आल्या आहेत. उर्वरित रस्त्यांच्या जागा ताब्यात येतील, त्यानुसार संबंधित रस्त्यांची कामे केली जातील.

- साहेबराव दांडगे, अधिक्षक, पथ विभाग, पुणे महापालिका