पुणे (Pune) : परिवहन विभागाने राज्यातील सर्वच वाहनांना आता उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट) अनिवार्य केली असल्याने २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावावी लागणार आहे. ही पाटी तयार करण्यासाठी परिवहन विभागाने राज्यात क्षेत्र स्तरांवर तीन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या वाहनांसाठी पुण्यात ६९ केंद्र स्थापन केली असून तिथे पाटी बदलण्याचे काम देखील सुरू झाले आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१९ पूर्वी म्हणजे २०१८ पर्यंत उत्पादित झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी अनिवार्य केली आहे. ‘एमएच १२’ क्रमांक असलेल्या वाहनांचा झोन एकमध्ये समावेश केला आहे. पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने पुण्यात पाटी बसविण्यासाठी तब्बल ६९ केंद्र स्थापन केली आहेत. वाहनधारकांना पाटी बसविण्यासाठी दोन दिवस आधीच नोंदणी करणार आहे. पुण्यासाठी रोझमर्ता सेफ्टी सिस्टीम लिमिटेड या कंपनीला कंत्राट दिले आहे. https://mhhsrp.com या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
यासाठी घेतला निर्णय
- वाहनाची चोरी होऊ नये, सुरक्षितता वाढावी
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी
- क्रमांकात कसल्याही प्रकारची छेडछाड करता येऊ नये
हे लक्षात ठेवा
- ज्या दिवशी पाटी लावायची आहे, त्याच्या दोन दिवस आधी ऑनलाइन नोंदणी करा
- पाटी लावण्याच्या दिवशी केंद्रावर जाणे शक्य झाले नाही तर ९० दिवसांपर्यंत कोणतीही तारीख निवडण्याची मुभा
- ९० दिवसांच्या आत जर पाटी बसविली नाही तर पाटीचे शुल्क परत केले जाणार नाही
- ३१ मार्च २०२५ पर्यंत पाटी लावणे अनिवार्य, तसे न झाल्यास आरटीओ प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल
हे आहेत शुल्क
- दुचाकी व ट्रॅक्टर : ४५० रुपये
- तीनचाकी : ५०० रुपये
- चारचाकी, मध्यम व जड व्यावसायिक वाहनांसाठी : ७४५ रुपये
(हे शुल्क विना ‘जीएसटी’ आहे)
उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्याचे खूप फायदे आहेत. यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते. वाहन चोरीच्या प्रकाराला आळा बसण्यास मदत होते. यासाठी पुण्यात ६९ केंद्र तयार केली असून पाटी लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
- स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे