पुणे (Pune) : शहरातील १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झाडणकाम करण्यासाठी काढलेल्या टेंडरमध्ये रिंग झाल्याचेच चित्र दिसून येत आहे. (Tender Ring In PMC Tender News)
ठेकेदारांनी एकमेकांना पुरक अशा टेंडर भरल्या असून, कोणत्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये कोणता ठेकेदार पात्र होणार हेदेखील निश्चित झाले आहे. त्यावर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी भूमिका स्पष्ट केली. या टेंडरमध्ये काही चुकीचे काही होऊ देणार नाही, टेंडरची मुदत संपली असली तरी अटी व नियमांत बदल केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.
पुणे शहरातील रस्ते, गल्लीबोळ झाडून काढण्यासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी टेंडर काढल्या जातात. या वर्षी टेंडर काढताना पूर्वीच्या नियम व अटी बदलण्यात आल्या आहेत. ठराविक ठेकेदार कसे पात्र होतील हे लक्षात घेऊन या अटी व शर्ती आहेत.
याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकारी व ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. टेंडर जाहीर होण्याआधीच सर्व प्रमाणपत्रे तयार असणे व चॅम्पियन मशिन खरेदी केलेली असणे आवश्यक आहे, ही अट अनिवार्य ठेवली आहे. त्यामुळे ज्यांना अटी व शर्ती पूर्वीच माहिती आहेत, अशा ठेकेदारांनाच ही कामे मिळणार आहेत, असे अधिकारी सांगत आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी चॅम्पियन मशिनची अट रद्द केली जाईल, असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात ही अट कायम ठेवण्यात आली आहे.
या टेंडरसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत तीन दिवसांपूर्वी संपली आहे, आलेल्या प्रस्तावांची कागदपत्र छाननी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या अटी व शर्ती आयुक्तांनी मान्य केल्याने त्याविरोधात कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही.
क्षेत्रीय कार्यालये घेतली वाटून
शहरातील प्रमुख काही ठेकेदारांनी टेंडर भरण्यापूर्वी एकत्र येऊन चर्चा केली. प्रत्येकाने क्षेत्रीय कार्यालय वाटून घेतले आहे. काहींना एक तर काहींना दोन ठिकाणी कामे मिळणार आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. झाडणकामासाठी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयासाठी ५ टेंडर आल्या आहेत.
हडपसर मुंढव्यासाठी ४, बिबवेवाडीसाठी ४, सिंहगड रस्त्यासाठी ४, धनकवडी सहकारनगरसाठी ५, कोंढवा येवलेवाडीसाठी ५, शिवाजीनगर घोले रस्त्यासाठी ४, नगर रस्ता वडगावशेरीसाठी ४, येरवडा कळस धानोरीसाठी ४, कसबा विश्रामबागसाठी ५, वारजे कर्वेनगरसाठी ५, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयासाठी ७, वानवडी रामटेकडी ५, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयासाठी ४ ठेकेदारांनी अर्ज केले आहेत.
अटी व शर्ती अंतिम करण्यासाठी समिती नेमली होती, मी त्याला केवळ मान्यता दिली आहे. या टेंडरमध्ये चुकीच्या पद्धतीने काही होणार नाही. चॅम्पियन मशिनच्या अटीबद्दलही विचार केला जाईल.
- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका