Vande Bharat Train
Vande Bharat Train Tendernama
पुणे

पुणेकरांची वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतिक्षा संपली; लवकरच सुसाट...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) ; पुण्याला वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) दोन रेक मिळणार हे निश्चित झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने यासाठी पाऊल टाकण्यास सुरवात केली आहे. पुण्यातील घोरपडी यार्डजवळ यासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्चून कोचिंग डेपो उभारले जात आहे. यासाठी नेमलेल्या कन्सल्टन्सीने घोरपडी डेपोचा सर्व्हे पूर्ण केला. यात पहिल्यांदाच कव्हरशेड असलेला पिटलाइन बांधण्यात येणार आहे. पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कोचिंग डेपो पूर्ण होताच पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेस धावण्यास सुरवात होईल.

भारतीय रेल्वेत सर्वांत गतिमान समजली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस आपल्या भागातून धावावी म्हणून प्रत्येक रेल्वे विभाग प्रयत्न करीत आहे. मध्य रेल्वेत हा मान मुंबई व पुणे विभागाला मिळत आहे. सध्या चेन्नई येथे वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे बनविण्याचे काम वेगाने सुरु आहे. जसे रेक तयार होतील. ते रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार प्रत्येक विभागास दिला जाणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेला देखील लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसचे रेक मिळणार आहेत. यात पुणे विभागाला मिळणाऱ्या दोन रेकचा देखील समावेश आहे. रेक मिळण्यापूर्वी काही तांत्रिक कामे करणे गरजेचे आहे. ते काम आता युद्धपातळीवर केले जात आहे.

पहिल्यादांच पिटलाइनला कव्हरशेड
पिटलाइन म्हणजे ज्या रुळावर डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम होते तो रूळ. वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे हे अन्य डब्यांच्या तुलनेने वेगळे आहेत. त्यांची रचना सामान्य डब्याप्रमाणे (कपलिंग व व्हेस्टिब्युयल) नाही. त्यामुळे यासाठी बांधण्यात येणारे पिटलाइन देखील वेगळ्या पद्धतीचे आहे. पहिल्यादांच यासाठी कव्हरशेड असलेले पिटलाइन बांधले जात आहे.

पुण्याला वंदे भारत एक्स्प्रेसचे दोन रेक मिळणार आहे. त्यासाठी कोचिंग डेपो बनविण्याचे काम घोरपडी येथे होत आहे. त्यासाठी नेमलेल्या कन्सल्टन्सीने सर्व्हेदेखील पूर्ण केला असून त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवून देण्यात येईल. त्यांनी त्याला मंजुरी देताच कोचिंग डेपोचे काम सुरु होईल.
- बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे