PMC Pune
PMC Pune Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील 'त्या' व्यावसायिकाला वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका; आता कारवाई करावीच लागणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : संभाजी पोलिस चौकीच्या मागील नियमबाह्य होर्डिंग (Illegal Hoarding) अधिकृत करण्यासाठी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून खटाटोप सुरू आहे. मात्र, आता हे होर्डिंग अधिकृत करण्याचा प्रस्ताव न पाठवता, थेट काढून टाकण्याचाच प्रस्ताव पाठवा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाला अखेर कारवाई करावी लागणार आहे.

टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंग उभारण्यात आले आहेत. हे होर्डिंग उभे करताना दोन होर्डिंगमध्ये प्रत्येकी एक मीटरचे अंतर न सोडणे, झाडे तोडणे, राडारोडा टाकून नियमांचे उल्लंघन केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी हा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर ऑगस्टमध्ये होर्डिंगच्या कामाला स्थगिती देण्यात आली. तसेच जाहिरात प्रसिद्धीवर बंदी आणण्यात आली.

होर्डिंग उभारताना प्रत्यक्षात जागेवर काय स्थिती आहे याकडे दुर्लक्ष केल्याने कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. या होर्डिंगचा परवाना रद्द केला, त्यानंतर २० बाय १०० फूट असा महाकाय लोखंडी सांगडा महापालिकेने काढणे अपेक्षित होते, परंतु ते गेल्या चार महिन्यांत काढून टाकले नाही.

जागा महापालिकेची

होर्डिंग व्यावसायिकाने ही जागा खासगी मालकीची असल्याचा दावा केला होता, पण अधिकाऱ्यांनी केलेल्या जागा पाहणीत ही जागा महापालिकेची असल्याचे समोर आले. तरीही क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित होर्डिंग व्यावसायिकास ११ महिन्यांच्या मुदतीने जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची हालचाल सुरू केली होती. यासंदर्भात माध्यमांत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आता प्रशासनाने भूमिका बदलत हे होर्डिंग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जागा भाड्याने देण्याचा विचार नंतर’

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यासंदर्भात म्हणाले, ‘‘संभाजी पोलिस चौकीच्या मागील होर्डिंग हे महापालिकेच्या जागेत आहे. ही जागा होर्डिंगसाठी द्यावी असा प्रस्ताव न पाठवता होर्डिंग काढून टाकण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत. ही जागा भाड्याने देण्यासंदर्भात त्यानंतर विचार केला जाईल.’’