पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) आता प्रवाशांची बॅग व सामान अधिक सुरक्षित राहणार आहे. रेल्वे प्रशासन मुंबईच्या धर्तीवर डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून देत आहे. येत्या महिनाभरात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरील क्लॉक रूम जवळचे ठिकाण निश्चित केले आहे. ‘लॉकर’ला टच स्क्रीन असणार आहे. यामध्ये हँडबॅग, मोबाईल किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवता येतील. स्वयंचलित पद्धतीने मशिन एक ‘ओटीपी’ प्रवाशाला देईल. लॉकर उघडताना ‘ओटीपी’ टाकायचा आहे.
चुकून ‘ओटीपी’ विसरल्यास तेथे दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून मदत घेता येईल. सध्याच्या क्लॉक रूममध्ये बॅग व अन्य साहित्य ठेवण्यासाठी पहिल्या सहा तासांसाठी १५ रुपये दर आकारले जातात. मात्र, डिजिटल क्लॉक रूमच्या सुविधेचे दर अद्याप ठरलेले नाही.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानकावर पहिल्यादांच डिजिटल लॉकरची सुविधा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांचे साहित्य अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल. लवकरच याची टेंडर प्रक्रिया सुरू होईल.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे