Pune
Pune Tendernama
पुणे

Pune : 'आमचे कंबरडे मोडले, आता तरी आवरा!' का संतापले पुणेकर?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रत्येक शंभर मीटरला एक गतिरोधक (Speed Breker), असे तब्बल १५० गतिरोधक एका रस्त्यावर आहेत. सर्व गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने तयार करण्यात आल्याने नागरिकांचे कंबरडे मोडू लागले आहे.

महापालिकेने (PMC) असे गतिरोधक तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अनधिकृत, अशास्त्रीय गतिरोधक तत्काळ काढून टाकावेत. तसेच, बेकायदा गतिरोधक तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागात अनधिकृत, अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. तरीही महापालिका प्रशासन त्याबाबत कुठलीही कारवाई करत नाही. नागरिकांच्याही याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.

निरंजन भट म्हणाले, कोथरूडमधील महात्मा सोसायटी येथील हिल व्ह्यू गृहप्रकल्प ते महात्मा सोसायटीचा मुख्य चौक येथे ७०० ते ८०० मीटर लांबीच्या रस्त्यावर ३४ गतिरोधक आहेत. सर्व गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीचे आहेत. इतक्‍या गतिरोधकांची गरज नाही. गरज असेल तिथे शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक तयार केले जावेत.

महात्मा सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर ५० मीटरवर गतिरोधक आहेत. १६ ते १७ गतिरोधक इथे आहेत. त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो, असे प्रशांत रत्नपारखी यांनी सांगितले. जयंत वाडेकर म्हणाले, महात्मा सोसायटी परिसरात नेहमी वापर असलेल्या रस्त्यावर तब्बल २६ प्रकारचे गतिरोधक आहेत. या गतिरोधकांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यावर योग्य उपाययोजना होण्याची गरज आहे.

मी १५ वर्षांपासून वडगाव शेरी ते चाकण असा प्रवास करत आहे. सुरवातीला नगण्य असणाऱ्या गतिरोधकांची संख्या आता तब्बल १५० पेक्षा जास्त झाली आहे. हे सर्व गतिरोधक अशास्त्रीय असून, त्यासाठी कुठल्याही नियमांचे पालन केलेले नाही. विश्रांतवाडी ते मॅगझीन कॉर्नरपर्यंत दर १०० मीटरला एक गतिरोधक आहे. विश्रांतवाडी ते आळंदी रस्त्यावरही हीच परिस्थिती आहे. गतिरोधक टाकण्यामागे मोठे आर्थिक गणित जोडले आहे. रस्त्यांचे प्रामाणिकपणे सर्वेक्षण करून अनधिकृत गतिरोधक काढले पाहिजेत, असे मत अनिल वाघ यांनी मांडले.

डहाणूकर कॉलनीतून महामार्गाकडे जाताना महात्मा सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणात गतिरोधक आहेत. त्यांचा वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची तक्रार धनंजय सुमंत यांनी केली.

गतिरोधक असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर ‘पुढे गतिरोधक आहे’ असे फलक काही वर्षांपूर्वीपर्यंत दिसत होते. त्यामुळे वाहनचालक सावकाश वाहने चालवीत होते. आता मात्र असे फलक कुठेही दिसत नाहीत, असे भूषण गोरे, रास्ता पेठ यांनी सांगितले.

अनधिकृत, अशास्त्रीय गतिरोधकांविरोधात नागरिकांनी अनेकदा आवाज उठविला आहे. अशा गतिरोधकांचा प्रश्‍न न्यायालयापर्यंत पोहचला आहे. परंतु, काही राजकीय व्यक्ती व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ठेकेदारांकडून वाट्टेल तसे गतिरोधक बनविले जात आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे अपघात होऊन जिवाला धोका पोचते, मान, पाठीचा कणा दुखावतो. काहीजण मुख्य रस्त्यावरच गतिरोधक बसवत आहेत, अशी तक्रार दिलीप कलाटे यांनी केली.

आमच्या परिसरात प्रचंड कठीण व टणक गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. अशा गतिरोधकांमुळे ज्येष्ठ नागरिक वाहन चालविताना त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्‍यता आहे, असे केशवनगर मुंढव्यातील शैलेंद्र कोद्रे यांनी सांगितले.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयामागे १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचा रस्ता असतानाही मंगल मित्र मंडळ ते सदानंद नगरपर्यंत महापालिकेने आठ ते १० गतिरोधक तयार केले आहेत. त्यामुळे दुचाकी, रिक्षा यांसारखी वाहने चालविताना तारांबळ उडते. जुना बाजार परिसरातही अनावश्‍यक गतिरोधक असल्याचे वास्तव विलास कांबळे यांनी मांडले.