पुणे (Pune) : धायरीतील हायब्लिस सोसायटी व डीएसके विश्व येथे समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारली आहे. तरीही धायरी व नऱ्हे भागातील रहिवाशांना खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते.
समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या टाक्या लवकरात लवकर कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख महेश पोकळे यांनी केली. याबाबत त्यांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांना निवेदन दिले.
उपअभियंता नितीन खुडे म्हणाले, ‘‘वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनीद्वारे या टाक्यांमध्ये पाणी आणण्यात येणार आहे. आता वडगाव जलशुद्धीकरण केंद्रापासून जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच पारी कंपनी चौक व हायब्लिस सोसायटी येथे समान पाणीपुरवठा करण्यासाठीचे व्हॉल्व टाकणे, जोड देणे अशी कामे सुरू आहेत.
कार्यकारी अभियंता हेमंत मोरे म्हणाले, ‘‘समान पाणीपुरवठा योजनेचे काम एक ते दीड महिन्यात पूर्ण करून धायरी व नऱ्ह्यातील रहिवाशांना पुरवठा सुरळीत करू.’’