Deemed Conveyance
Deemed Conveyance Tendernama
पुणे

Pune News : तुमच्या सोसायटीचे डीम्ड कनव्हेन्स झालेय का? नसल्यास ही बातमी वाचा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्य सरकारने जमिनीचा मालकी हक्क गृहसंस्थेला प्रदान करून देण्यासाठी हाती घेतलेल्या मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance) मोहिमेला सोसायट्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. चार महिन्यांत सुमारे २१२ सोसायट्यांनी मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या वर्षभरात ही संख्या आठशेपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज सहकार खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया राज्य सरकारकडून अधिक सुलभ करण्यात आली आहे. ज्या सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण झालेले नाही, अशा सोसायट्यांसाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार सहकार आयुक्तांनी पुढाकार घेतला असून, विशेष मोहीम एक एप्रिलपासून सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) संजय राऊत यांनी दिली. यापूर्वी वर्षभरात मानीव अभिहस्तातंरण करण्यासाठी सुमारे तीनशे अर्ज दाखल होत होते. मोहीम हाती घेतल्यानंतर अर्ज दाखल करणाऱ्या सोसायट्यांची संख्या वाढली आहे, असेही ते म्हणाले.

का आवश्‍यक?
- बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ही इमारत सोसायटीकडे हस्तांतर करणे बंधनकारक आहे.
- अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून ही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने सहकार विभागाकडून मानीव अभिहस्तांतरण करून देण्यात येते.
- सोसायटीचे हस्तांतर न झाल्यास भविष्यात सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल, तर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून घ्यायचा असेल तर अडचणी येतात.
- त्यामुळे संबंधित जागेची मालकी हक्क असलेला पुरावा म्हणजे सातबारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्डवर यावर गृहनिर्माण संस्थेचे नाव असणे आवश्‍यक आहे.
- अभिहस्तांतरण झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतात.
- तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकांचा हक्क संपुष्टात येतो.
- त्यामुळे मानीव अभिहस्तांतरण करणे आवश्‍यक आहे.

आवश्‍यक कागदपत्रे
सोसायटीचा अंतिम मंजूर लेआऊट आणि सातबारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्ड यापैकी एक ही दोनच कागदपत्रे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी आवश्‍यक आहे. त्यामुळे सोसायट्यांनी पुढे येऊन या मोहिमेत सहभागी व्हावे. अधिक माहिती हवी असल्यास उपनिबंधक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन राऊत यांनी केले.

सध्या काय स्थिती आहे?
- पुणे शहरातील सहकारी संस्थांची एकूण संख्या - २० हजार ६५५
- सरकारच्या मालकी हक्काच्या जागेवर असलेल्या संस्थांची संख्या - एक हजार २९
- म्हाडाच्या मालकीच्या सहकारी संस्थांची संख्या - २२५
- बंगलो सोसायट्यांची संख्या - एक हजार ९७१
- यापूर्वी मानीव अभिहस्तांतरण केलेल्या सोसायट्यांची संख्या - चार हजार १३८
- बांधकाम व्यावसायिकांनी मानीव अभिहस्तांतरण करून दिलेल्या सोसायट्यांची संख्या - सुमारे दोन हजार
- गेल्या चार महिन्यांत नव्याने मानीव अभिहस्तांतरण झालेल्या सोसायट्यांची संख्या - १६०