पिंपरी (Pimpri) : बेशिस्त वाहनचालक, वाहतूक नियोजनाचा अभाव आणि उदासीन प्रशासन यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गडद होत चालली आहे. (Pune Nashik Highway Traffic Problems News)
का लागतात लांबच लांब रांगा?
सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागत आहेत. चाकण, मोशी, भोसरी परिसरातून कामानिमित्त पुणे शहरात जाणाऱ्या आणि भोसरी, मोशी परिसरातून कामानिमित्त चाकण ‘एमआयडीसी’मध्ये जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांना महामार्ग क्रमांक-६० जोडतो. तसेच उत्तर महाराष्ट्रातून येणारी वाहने चाकणमार्गे मुंबई आणि अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी याच महामार्गाचा वापर करतात.
पुणे जिल्ह्यात तळेगाव, चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी असल्यामुळे या महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच पुणे आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल घेऊन जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते; पण गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, कर्मचारी, शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी त्रस्त आहेत.
आंबेठाण चौक ते नाशिक फाटा २१ किमी अंतर पार करण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी एक ते दीड तास वेळ लागतो. वाहतूक कोंडी झाल्यास दोन ते तीन तासापेक्षा अधिक वेळ लागतो.
अतिक्रमण काढले पुढे काय?
पीएमआरडीए प्रशासनाने पुणे-नाशिक महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढले आहे. अतिक्रमण काढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता मोकळा झाला. मात्र, वाहतूक कोंडी काही केल्या कमी झाली नाही. त्यामुळे अतिक्रमण काढले पुढे काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अतिक्रमण हे वाहतूक कोंडीसाठी असलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण होते. त्यामुळे केवळ अतिक्रमण काढून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. तर अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करणे आवश्यक आहे. पण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) रस्ता रुंदीकरण करण्यात आला नाही. तसेच रस्त्याच्या लगतचा साइड पट्टा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे त्या जागेचा वापर होताना दिसून येत नाही.
भुयारी मार्गाची आवश्यकता..
पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक ते नाशिक फाटा हे अंतर २१ किलोमीटर आहे. या २१ किलोमीटर अंतरावर तब्बल १७ ठिकाणी दुभाजक खंडित केले आहेत. यातील केवळ तेरा ठिकाणीच सिग्नल यंत्रणा आहे. तसेच १७ ठिकाणांपैकी सात चौकातच वाहतूक पोलिस असतात. या महामार्गावर दुभाजक खंडित केलेल्या ठिकाणी कंटेनर, अवजड वाहने युटर्न घेताना वाहतूक कोंडी होताना दिसून येते. यापैकी अनावश्यक दुभाजक बंद करून, इतर ठिकाणी भुयारी मार्ग सुरु केल्यास वाहतूक कोंडीला ब्रेक लागू शकतो.
वाहनचालक नाशिक फाटा ते आंबेठाण चौक विनाअडथळा जाऊ शकतात. पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते राजगुरुनगरपर्यंत २८ किलोमीटरचा एलिव्हेटड मार्ग प्रस्तावित आहे. पण, हे काम कधी सुरू होणार? काम पूर्ण व्हायला आणखी किती वर्षे लागणार? तो पर्यंत या महामार्गावर भुयारी मार्ग सुरू केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल.
अशी आहेत कारणे
- प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ बस रस्त्याच्या मध्येच थांबतात
- कामगारांना चढ-उतार करण्यासाठी खासगी कंपन्यांच्या बस रस्त्याच्या मध्येच थांबतात
- वीस किलोमीटरमध्ये तब्बल १७ ठिकाणी दुभाजक खंडित केला असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर
- उलट्या दिशेने वाहतूक
- साइड पट्टा खचल्यामुळे वाहतुकीस अडथळा
- तळेगाव चौक, भारतमाता चौकसह इतर चौकातच रिक्षा थांबा
- बऱ्याच ठिकाणी दुभाजक तुटलेले
- वाहतूक पोलिस वाहन चालकांवर कारवाई करण्यातच व्यस्त
- कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि ट्रॅव्हल्स बस या एकाच वेळी रस्त्यावर
काय आहेत उपाययोजना
- मुख्य चौकातील रिक्षा स्टॅन्ड हटविणे
- पीएमपीएमएलला महामार्गाच्या आतील बाजूस थांबे उभारणे
- रस्त्यावर थांबणाऱ्या खासगी बस चालकांवर कारवाई करणे
- अनावश्यक दुभाजक बंद करणे
- भुयारी मार्ग तयार करणे
- साइड पट्टा दुरुस्त करणे
- रस्ता रुंदीकरण
- तळेगाव चौकात उड्डाणपूल उभारणे
हे आहेत वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट
मोशी गावठाण, चिंबळी फाटा, मोई फाटा, बर्गे वस्ती फाटा, कुरुळी फाटा, आळंदी फाटा, एमआयडीसी फाटा, मुटकेवाडी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक, बिरदवडी फाटा
‘‘मोशी येथून राजगुरुनगरला कॉलेजला जातो. दररोज मोशी ते आंबेठाण चौकापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. कधी कधी तर दोन दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे कॉलेजला जायला उशीर होतो.
- दत्ता माने, विद्यार्थी
‘‘बेशिस्त वाहन चालक, उदासीन प्रशासन आणि नाकर्ते राजकारणी यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर महामार्गाचा विस्तार रखडला आहे. गेले अनेक वर्ष या दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. पण, यावर ठोस उपाययोजना होत नाही. सर्वसामान्यांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार.
- विकास गवते, स्थानिक नागरिक
‘‘मी कामासाठी दररोज चाकणवरुन दापोडीला जातो. दापोडी ते नाशिक फाटा प्रवास करण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. पण, नाशिक फाटा ते चाकण प्रवास करण्यासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो. या वाहतूक कोंडीमुळे बराच वेळ प्रवासातच जातो. यावर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात.
- रामदास खेडकर, नोकरदार