Stamp
Stamp Tendernama
पुणे

Pune: 1985 पासूनचे जुने दस्त पाहायचेत; मग फक्त येवढेच करा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई व उपनगर वगळून राज्यातील १९८५ पासूनचे दस्त एका क्लिकवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे काम नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हाती घेतले आहे. व्यवसायपूरकता (इज ऑफ डुइंग बिझनेस) उपक्रमांतर्गत ही सुविधा देण्यात येईल. हे काम जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. स्कॅन झालेले दस्तावेज विभागाच्या ‘ई-सर्च’ पर्यायावर उपलब्ध करण्यात आले.

जमीन किंवा सदनिकांचे खरेदी व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतींच्या मालकी हक्कात झालेले बदल पाहणे आवश्यक ठरते. हे बदल पाहण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन कागदपत्रांचा शोध घ्यावा लागतो आणि मिळकत तपासणी अहवाल (सर्च रिपोर्ट) काढावा लागतो. सामाईक क्षेत्रात एकापेक्षा अधिक कार्यालये असतात. त्यामुळे नागरिकांना अशा कार्यक्षेत्रातील व्यवहारांचा शोध घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात.

या पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने १९८५ पासूनचे दस्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या सुविधेद्वारे शोधलेल्या दस्ताची किंवा दस्तांच्या सूचीची (इंडेक्स) प्रत डाउनलोडही करता येते. तसेच त्याची प्रमाणित प्रत हवी असल्यास अल्प शुल्क आकारून ती प्रमाणित करून देण्याच्या सुविधेचाही समावेश आहे. जुने दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.

दरम्यान, व्यवसायपूरकता उपक्रमांतर्गत जागतिक बँकेकडून दिल्ली आणि मुंबई ही दोन शहरे निवडण्यात आली होती. त्या अंतर्गत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या दोन्ही महानगरांमधील १९८५ पासूनची सर्व माहिती विभागाच्या संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.


राज्यातील ५०० पेक्षा जास्त दुय्यम निबंध कार्यालयांमध्ये दस्तावेजांसाठी कार्यवाही सुरू आहे. काही जिल्ह्यांतील मिळकती कमी असल्याचे त्यांचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे.
- अभिषेक देशमुख, उपमहानिरीक्षक (संगणक), नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग