Pune PMC Tendernama
पुणे

Pune : गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात, आता महापालिकेने...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील काम शेवटच्या टप्प्यात पोहोचले, मात्र दुसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक जागा अद्यापही पूर्णपणे महापालिकेला मिळालेल्या नाहीत. ५१ मिळकतींपैकी केवळ १० मिळकतीच ताब्यात आल्या आहेत. उर्वरित मिळकतींपैकी बहुतांश मिळकती सरकारी मालकीच्या असल्याने महापालिकेकडून त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील (आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक) चौकापासून रेंजहिल्स कॉर्नरपर्यंत बहुमजली उड्डाण पूल बांधला जात आहे. या रस्त्यावरच मेट्रो प्रकल्पाचे कामही वेगात सुरू आहे. दरम्यान, या प्रकल्पांची कामे एकीकडे सुरू असतानाच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणाचेही काम केले जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरचे काम अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी महाविद्यालयाच्या जागेचा अपवाद वगळता पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

एकीकडे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत असताना, दुसऱ्या टप्प्यातील दोन किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरणासाठी अद्याप पूर्णपणे जागा ताब्यात आलेल्या नाहीत. दुसऱ्या टप्प्यात रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी महाविद्यालय ते संचेती रुग्णालय, शिवाजीनगर ते धोत्रे पथ या दरम्यान रुंदीकरण होणार आहे. या मार्गामध्ये एकूण ५१ मिळकती रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होत आहेत. त्यापैकी १० मिळकती महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. उर्वरित मिळकतींमध्ये आकाशवाणी केंद्र, कृषी महाविद्यालय, हवामान विभाग या केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील संस्थांच्या जागांचा समावेश आहे. या जागा मिळाव्यात, यासाठी संबंधित संस्थांना महापालिकेच्या मालमत्ता विभागाने प्राथमिक प्रस्ताव पाठविला आहे. आता अंतिम प्रस्ताव महापालिकेकडून पाठविला जाणार असल्याची माहिती मालमत्ता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दुसऱ्या टप्प्यासाठी २० कोटींची तरतूद

महापालिकेने गणेशखिंड रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरणाच्या कामासाठी अंदाजपत्रकामध्ये २० कोटी रुपयांची यापूर्वीच तरतूद केली आहे. ५१ पैकी १० जागा ताब्यात आल्या आहेत. उर्वरित जागा ताब्यात आल्यानंतर महापालिकेस रस्ता रुंदीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करता येणार आहे.