charging station
charging station Tendernama
पुणे

ई वाहनधारकांसाठी खूशखबर; पुणे महापालिका उभारणार ३०० चार्जिंग पॉइंट

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेडून ई वाहनांना प्रोत्साहन दिले जात असताना त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. आता खासगी वाहनांसाठी शहराच्या सर्व भागात चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या इमारती, नाट्यगृह, वाहनतळ, उद्याने अशी ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. यातून ३०० चार्जिंग पॉइंट उपलब्ध होणार आहेत.

काय आहे स्थिती?
- शहरात डिझेल, पेट्रोल वाहनांची संख्या सुमारे ४० लाख
- त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण
- इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांकडून चारचाकी, दुचाकी खरेदी करण्याकडे कल
- तीन वर्षांत पुणे शहरातील इलेक्ट्रीक वाहने वापरण्याच्या प्रमाणात तिपटीने वाढ
- ‘पीएमपी’च्या ताफ्यात ई बसच्या संख्येते वाढ
- पुढील काही महिन्यात आणखी २०० बस येणार

धोरणात्मक निर्णय
महापालिकेने ई वाहनांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये नवीन बांधकाम करताना त्यात ई वाहनांच्या चार्जिंगची सुविधा करणे बंधनकारक केले आहे. ज्या नागरिकांकडे ई वाहने नाहीत पण त्यांना शहरात फिरण्यासाठी भाड्याने ई बाईक मिळणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पहिल्या टप्प्यात २५० ठिकाणी ई बाईक मिळणार आहे. या कामास मंजुरी मिळाली असून, पुढील सहा महिन्यांत ही सेवा उपलब्ध होईल.

उत्पन्नही मिळणार
ई कार विकत घेतल्यानंतर नागरिकांना स्वतःला चार्जिंगची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी बराच खर्च येतो. तसेच हे चार्जिंग स्लो असल्याने किमान चारपाच तरी गाडी चार्जिंगसाठी लागतात. महापालिकेने ई वाहनांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करताना कमी वेळात चार्जिंग व्हावे यासाठी फास्ट चार्जर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एका तासात एक कार पूर्ण चार्जिंग शक्य होणार आहे. हे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिका फक्त जागा देणार आहे, तेथे चार्जिंगची व्यवस्था करणे, स्टेशन चालविणे हे संबंधित ठेकेदारास काम करावे लागणार आहे. ठेकेदाराला मिळणाऱ्या फायद्यातून ठराविक हिस्सा महापालिकेला द्यावा लागणार आहे. त्यामुळे उत्पन्नही मिळणार आहे.

या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन
- ३० वाहनतळ
- १० उद्यान
- ३ रुग्णालय
- १५ महापालिका क्षेत्रीय कार्यालय
- ५ महापालिका प्रशासकीय इमारती
- १४ नाट्यगृह

एका तासाला एक मोटार चार्ज
महापालिकेच्या वाहनतळावर एकाच वेळी पाच मोटार, तर इतर ठिकाणी दोन ते तीन मोटार चार्ज होतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. एका तासाला एक कार चार्जिंग होणार आहे. त्यामुळे चार्जिगंची सुविधा मुबलक उपलब्ध असणार आहेत. सध्या शहरात महापालिकेचे महापालिका भवनात एकमेव चार्जिंग स्टेशन आहेत. पण आता शहराच्या सर्व भागात सुविधा उपलब्ध होणार आहे.

नागरिकांचा ई वाहन खरेदीकडे कल वाढत आहे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका ई कार चार्जिंग स्टेशन उभारत आहे. आत्ता कदाचित गरज कमी असेल पण भविष्यात गरज वाढणार आह. त्यामुळे महापालिका पायाभूत सुविधा पुरवत आहे. वाहनतळ, क्षेत्रीय कार्यालये, नाट्यगृहे, क्रीडांगणे, उद्याने याठिकाणी अशा गर्दीच्या ठिकाणी व जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी चार्जिंग स्टेशन असणार आहेत. एका तासात कार चार्ज होईल त्यामुळे नागरिकांना जास्त वेळ वाट पाहण्याची गरज नाही. या ठेकेदाराला चार्जिंगमधून जो फायदा होईल त्यातील काही हिस्सा महापालिकेलाही मिळणार आहे. नागरिकांना परवडेल असे शुल्क व महापालिकेला दिला जाणारा हिस्सा याचा विचार करून जो प्रस्ताव योग्य असेल अशी निविदा मंजूर केली जाईल.
- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

पुणे शहरातील ई वाहनांची संख्या
शहरातील एकूण ई वाहनांची संख्या (२०११ ते २०२२) - २१७४७
ई बाईक - १८३६७
ई कार - १९०२
बस - ६२४
ई रिक्षा - ४६३
इतर वाहने - ३९१