E-Toilet
E-Toilet Tendernama
पुणे

Pune : आधीचे ई-टॉयलेट धुळखात पडलेले असतानाही पुन्हा नव्याने घाट

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) पुन्हा एकदा ई-टॉयलेट्‌स कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचे टेंडर स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रायोगिक तत्त्वावर पाच ई-टॉयलेट चालविण्यात येणार आहेत. या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांच्या कामांना पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ मिळणार आहे. यापूर्वी महापालिकेने उभारलेले १५ ई- टॉयलेट धूळखात पडलेले असतानाही हा प्रयोग पुन्हा राबविला जात आहे.

पुणे महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत खासदार निधीतून दोन कोटी रुपये खर्च करून १५ ठिकाणी २०१५ मध्ये अत्याधुनिक स्वयंचलित ई-टॉयलेट बसविले आहेत. येथे एकूण २१ सीट्‌स आहेत. संबंधित टॉयलेट्‌स बसविणाऱ्या कंपनीने करारानुसार वर्षभर या सर्व टॉयलेट्‌सच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले. दरम्यान, कोरोनामुळे संबंधित टॉयलेट्‌सच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. तेव्हापासून संबंधित टॉयलेट्‌स बंद आहेत, तर काहींची तोडफोड झाली आहे.

पहिल्यांदा ५ ई-टॉयलेट्‌स प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी चालविण्याचे काम दिले जाणार आहे. कामाची उपयुक्तता व गुणवत्तेचा आढावा घेऊन प्रथम तीन वर्षांसाठी व नंतर आणखी दोन वर्षांसाठी कामाला मुदतवाढ दिली जाईल. या मुदतवाढीचा निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना असणार आहे. संबंधित टॉयलेटस् चांगले असल्यास दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यास १४ लाख १२ हजार ४०० पर्यंत, पुढील पाच वर्षांसाठी दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी प्रति सीट प्रति महिना सात हजार रुपये या प्रमाणे ९६ लाख ६० हजार अधिक जीएसटी असे एक कोटी १० लाख ७२ हजार ४०० रुपये खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.