Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Tendernama
पुणे

पुणे महापालिकेने सुरक्षा रक्षकांसाठी काढले तब्बल ४२ कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेच्या विविध इमारती, उद्यानांसाठी ठेकेदाराकडून सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. १ हजार ६४० सुरक्षा रक्षकांसाठी तब्बल ४२ कोटींचे टेंडर काढले जाणार आहे. गेल्यावर्षी हे टेंडर काढताना महापालिकेत आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगले होते.

महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालये, विविध वास्तू, मैदान, उद्याने या ठिकाणी सुरक्षा रक्षक आवश्‍यक आहेत. महापालिकेकडे सुरक्षा रक्षकाच्या ६५० जागा आहे, त्यापैकी केवळ ३५० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने हे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून सुरक्षा रक्षक नियुक्तीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

महापालिकेत सध्या हे काम क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडे आहे. गेल्या वर्षभरात वेळेवर वेतन न देण्यावरून प्रशासनाने कंपनीला नोटिसा पाठविल्या होत्या. तसेच या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळते की नाही, त्यांचा पीएफ भरला जातो की नाही हे तपासताना प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. या कंपनीची मुदत ३१ ऑॅगस्ट रोजी संपणार असल्याने नव्याने ठेकेदार नियुक्त करून सुरक्षा रक्षक पुरविले जाणार आहेत. सुरक्षा विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप म्हणाले, महापालिकेच्या सुरक्षा विभागाने नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. १ हजार ६४० सुरक्षा रक्षक ठेकेदाराकडून घेतले जातील. याचे टेंडर २९ ऑॅगस्टला उघडले जाणार आहे.