Mula River
Mula River Tendernama
पुणे

पुण्यात नदी काठ सुधार योजनेत आता 'या' टप्प्यासाठी काढले नवे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नदी काठ सुधार योजनेत आता मुळा नदीवर बाणेर-बालेवाडी-औंध या आठ किलोमीटरच्या टप्प्याचे काम करण्यासाठी लवकरच ६१० कोटी रुपयांचे टेंडर काढले जाणार आहे. या टप्प्यात चार किलोमीटरचा एक भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. याचा अर्धा खर्च या महापालिकेने द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पुणे महापालिकेतर्फे मुळा-मुठा नदी काठ सुधार योजना राबविण्यात येत आहे. ११ टप्प्यांमध्ये ४४ किलोमीटर नदीचे सुशोभीकरण केले जाणार आहे. योजनेतील संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या दोन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता या प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे.

मुळा नदी पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या सीमेवरून वाहते. बाणेर, बालेवाडी आणि औंध हा आठ किलोमीटरचा टप्पा आहे, त्यातील चार किलोमीटरचा एका काठ पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत आहे. महापालिकेने दोन्ही काठाचा सुधार करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्याचा खर्च ६१० कोटी रुपये इतका आहे. यातील निम्मा खर्च हा पिंपरी-चिंचवड महापालिकेने करावा, यासाठी आयुक्तांशी चर्चा सुरू आहे.

मुळा-मुठा नदी सुधार योजनेसंदर्भात हे आक्षेप होते, त्यावर सिंचन विभागाला लेखी उत्तर दिले आहे. नदीच्या पाणी वहन क्षमता कमी होणार नाही, नदी काठी व्यावसायिक बांधकाम केले जाणार नाही, नदीतील पाणी स्वच्छ राहण्यासाठी त्या पाण्यावर प्रक्रीया करूनच नदीत सोडले जाईल, असे लेखी आश्‍वासन आम्ही दिले आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त