PMC Pune
PMC Pune Tendernama
पुणे

काय बोलता? पुणे मनपा करतेय आंघोळीची चकाचक व्यवस्था; टेंडरही मंजूर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेतर्फे (PMC) शहरात अत्याधुनिक पद्धतीचे ११ आकांक्षी स्वच्छतागृह उभारण्यासाठी २ कोटी ७६ लाख ९५८ रुपयांच्या टेंडरला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्रत्येक स्वच्छतागृह सुमारे ७०० चौरस फुटांचे असणार आहे. यामध्ये पेपर नॅपकिन, सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग मशिन आणि अंघोळीची सोय असणार आहे.

राज्य सरकारतर्फे पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले जात असताना राज्यातील मोठ्या शहरामध्ये आकांक्षी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनातर्फे प्रतिसीट दीड लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. पुणे महापालिकेने आकांक्षी स्वच्छतागृहात पाच सीट पुरुषांसाठी, तर पाच सीट महिलांसाठी बांधण्यासाठी ३६ लाख २८ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. त्यानुसार प्रत्येक स्वच्छतागृहासाठी स्वतंत्र टेंडर काढण्यात आले. त्यात नगर खराडी येथे २१ लाख ४२ हजार २३४ रुपयांचे टेंडर मंजूर केले.

भेकराई जकात नाका येथे २३ लाख ५५ हजार, वाघोली येथे २३ लाख ५५ हजार, लोहगाव येथे २१ लाख ९० हजार, येरवडा आंबेडकर चौक येथील स्वच्छतागृहासाठी २३ लाख ८४ हजार, हाय स्ट्रीट बालेवाडी येथील स्वच्छतागृहाचे २६ लाख ५९ हजार, ससून रस्ता येथे २४ लाख ९० हजार रुपयांना देण्यास मान्यता देण्यात आली. वारजे चौधरी उद्यान येथे २२ लाख २९ हजार, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया येथे २९ लाख ८७ हजार, म्हात्रे पूल एरंडवणे येथे २९ लाख ८७ हजार, गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) येथे २८ लाख ९४ हजार रुपये खर्च करून आकांक्षी स्वच्छतागृह बांधले जाणार आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

आकांक्षी स्वच्छतागृहांची संकल्पना चांगली आहे. नागरिकांना अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पण स्वच्छतागृह उभारल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्ती आव्हानात्मक ठरते. यापूर्वी खासदार निधीतून उभारण्यात आलेली ई-टॉयलेट बंद पडली. आता त्यांची दुरुस्ती करण्यासाठीही महापालिकेला ठेकेदार मिळत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

महापालिका आत्ता स्वच्छतागृह बांधणार आहे. पण याची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी स्वतंत्र संस्था नियुक्त केली जाईल. यासाठी स्वच्छतागृहाच्या शेजारची जागा संबंधित संस्थेला दिली जाईल. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वच्छतागृह स्वच्छ केले जाईल.
- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग