पुणे (Pune) : शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे, त्यामुळे पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व ३०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या ८० शाळांमध्ये ३ कोटी ७९ लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. त्यासाठीच्या खर्चास पूर्वगणनपत्रक समितीने मान्यता दिली आहे.
बदलापूर येथे शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने झाली आहेत. या घटनेतील आरोपीचा पोलिसांनी एनकाऊंटरही केला आहे. या घटनेमुळे राज्य सरकारलाही मोठा रोष सहन करावा लागला. या घटनेची गंभीर दखल घेत शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याचा आदेश दिला होता. पुणे महापालिकेच्या शहराच्या जुन्या हद्दीसह समाविष्ट ३२ गावांत मिळून सुमारे ३०० शाळा आहेत. विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाने एकत्रितपणे सर्व शाळांचे सर्वेक्षण केले. शाळेच्या इमारतीमध्ये किती खोल्या आहेत, किती मजले आहेत, मोकळी जागा, प्रवेशद्वार किती आहेत याची पाहणी केली. त्यानुसार या सर्व इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी तब्बल १७ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. पण महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद नसल्याने ही कामे करण्याचा प्रश्न निर्माण झाला.
एवढा मोठा खर्च लगेच करणे शक्य नसल्याने शिक्षण मंडळाने वर्गीकरणाद्वारे ३ कोटी ७९ लाख रुपयांचे वर्गीकरण करून रक्कम उपलब्ध केली. त्यातून मुलींच्या ८० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. उर्वरित शाळांसाठी आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. ३ कोटी ७९ लाख रुपयांच्या पूर्वगणनपत्रकास समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती विद्युत विभागाच्या प्रमुख मनिषा शेकटकर यांनी दिली.
मुलींच्या शाळांना प्राधान्य
खासगी तसेच शासकीय शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये तेथे काम करणारे कर्मचारी, शिक्षक, बसचालक यासह अन्य लोकांकडून मुलींना लक्ष्य केले जाते. त्यामुळे महापालिकेने पहिल्या टप्प्यात प्राधान्याने सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुलींच्या शाळांची निवड केली आहे.