पुणे (Pune) : उरुळी देवाची, फुरसुंगी कचरा डेपोतील जैविक उत्खननाच्या (बायोमायनिंग) टेंडर प्रकरणाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी चौकशी करावी आणि या टेंडरमधील आर्थिक बाबींसंदर्भात मुख्य लेखा परीक्षकांनी अहवाल सादर करावा, असा आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे बायोमायनिंगचे टेंडर काढण्यात आले. या बायोमायनिंगचे टेंडर, यापूर्वी दिलेली बिले यासह सध्या अस्तित्वात असलेल्या कचऱ्यात माती किती, कचरा किती याची तपासणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी शहर काँग्रेसच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी महापालिका भवनासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. यावर मंगळवारी (ता. ८) रात्री महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या वेळी सुराणा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याशी चर्चा झाली.
आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले, ‘उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चौकशी करण्यास सांगितले. तसेच त्यांना जुन्या बिलांची मुख्य लेखा परीक्षकांकडून तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे.’ भरत सुराणा म्हणाले, ‘महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याने उपोषण मागे घेतले आहे. योग्य पद्धतीने चौकशी न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल.’