Pune
Pune Tendernama
पुणे

पुण्यात आयुक्तांनीच अनुभवली रस्त्यांची स्थिती; ठेकेदारांवर कारवाई

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून महापालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठत असल्याने खुद्द महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाच रस्त्यांची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. मध्यवर्ती भागातील टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यासह सिंहगड रस्ता परिसरातील रस्त्यांची दुरावस्था आयुक्तांनी स्वतः अनुभवली.

रस्त्यांची झालेली चाळण, ठिकठिकाणी साचणारे पाणी, बिघडलेल्या चेंबर्स लेव्हल व त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल याचे दर्शन आयुक्तांना झाले. रस्त्यावर पडलेली खडी काढून घ्या, खड्डे बुजवा असे आदेश आयुक्तांनी दिले. तर दुसऱ्या बाजूला आता पावसाळ्यापूर्वी ठेकेदारांनी केलेल्या रस्त्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी मागवली असून, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले. बुधवारी दिवसभरात शहरातील ८८ खड्डे बुजविण्यात आले आहेत.

आठवडाभरापासून शहरांमध्ये पावसाचा चांगला जोर आहे. त्यामुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे. नव्याने केलेल्या रस्त्यांवर तीन महिन्यांतच मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. सांडपाणी व पावसाळी गटारांच्या चेंबरच्या बाजूने खड्डे पडले आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यावरील जागांची पाहणी केली. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी, आनंदनगर, प्रयेजा सिटी या परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, पसरलेली खडी पाहून हे रस्ते लगेच दुरुस्त करून घ्या, अपघात होणार नाहीत गाड्या घसरणार नाहीत या दृष्टीने उपयोजना करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कारवाईचा प्रस्ताव करा : खेमणार
ज्या ठेकेदारांचा दोष दायित्व कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) संपलेला नाही अशा रस्त्यांवरही खड्डे पडल्याच्या तक्रारी येत आहेत. पावसाळ्यापूर्वी झालेल्या कामांतही खड्डे पडले आहेत. हे खड्डे ठेकेदारांकडून दुरुस्त करून घ्यावेत. तसेच त्यांच्या निविदेतील अटी शर्तीनुसार दंड वसूल करावा, तसेच शर्तींचा भंग केल्याने ठेकेदारांवर कारवाई चा प्रस्ताव तयार करा, असे पत्र अतिरिक्त आयुक्त खेमणार यांनी पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांना दिले आहे.