Vikram Kumar, PMC
Vikram Kumar, PMC Tendernama
पुणे

Pune : पीएमपीच्या 'या' कारनाम्यामुळे महापालिका प्रशासन टेन्शनमध्ये

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (PMP) तोटा दरवर्षी वाढतच आहे. चालू वर्षात संचलनातील तूट एक हजार कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामळे त्याचा भार पुणे महापालिकेवरही पडणार असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत पीएमपीतर्फे बससेवा दिली जाते. शहर व जिल्ह्यातील गावांसाठी ही एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. ‘पीएमपी’च्या ३९२ मार्गावर दररोज एक हजार ६५० बस धावत आहेत. यातून सुमारे १२ लाख प्रवासी प्रवास करतात. दैनंदिन उत्पन्न एक कोटी ७२ लाख रुपये इतके आहे. पण त्यातुलनेत ‘पीएमपी’चा खर्च जास्त आहे.

‘पीएमपी’च्या ११ हजार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दिले जाणारे वेतन, दिवाळी बोनस, इंधन, देखभाल-दुरुस्तीचा खर्च मोठा आहे. तसेच ठेकेदारांनाही वेळेवर पैसे द्यावे लागतात.

ठरावीक मार्ग सोडल्यास बहुतांश मार्ग तोट्यात आहेत. पण नागरिकांना सेवा देण्यासाठी बस सुरू ठेवावी लागते. या कारणामुळे दरवर्षीचा तोटा वाढत चालला आहे. यंदा ‘पीएमपी’ला सहाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असून, एक हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. २०२२-२३ वर्षात ५१० कोटी रुपयांचा महसूल मिळाला, तर एक हजार १६२ कोटी रुपये इतका खर्च होता.

या तोट्याचा भार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ‘पीएमआरडीए’ला सहन करावा लागतो. चालू वर्षात एक हजार कोटी रुपयांपर्यंत तोटा गेल्यास त्यापैकी ५०० कोटी रुपये महापालिकेला ‘पीएमपी’ला द्यावे लागणार आहेत.

पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधले जात आहेत. यावर पुढच्या बैठकीत चर्चा केली जाईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका