Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune : चांदणी चौकातील 'तो' पूल रखडण्यास मेट्रोच जबाबदार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandani Chowk) पादचारी पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र मेट्रो प्रशासनाकडून एक पूल (स्काय वॉक) बांधण्याचा प्रस्ताव आहे.

हे दोन्ही पूल एकमेकांना जोडण्याचा मेट्रोचा प्रस्ताव होता. मेट्रोच्या कामाला उशीर होत असल्याने प्राधिकरणाने प्रस्तावाला नकार देत पादचारी पुलाचे काम सुरू केले. मेट्रोच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात काही दिवस गेल्यामुळे पुलाच्या कामाला उशीर झाला.

प्राधिकरणातर्फे पादचाऱ्यांसाठी नवीन पूल बांधण्यात येत आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्च करून १२५ मीटर लांबीचा व ६.६ मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येत आहे. हा पूल पाषाण ते मुंबईच्या दिशेने असलेल्या बसथांब्यादरम्यान बांधण्यात येत आहे.

सध्या पुलाच्या खांबासाठी सुमारे ३० फूट खड्डा खोदण्यात आला. या व्यतिरिक्त पुलाचे कोणतेही काम झालेले नाही. यानंतर पाया (फाउंडेशन) बांधण्यात येणार आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मार्च २०२५ मध्ये पूल पादचाऱ्यांच्या सेवेत येईल, असे नियोजन प्राधिकरणाने केले आहे.

पादचाऱ्यांची होणार सोय

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ८६५ कोटी रुपये खर्च करून चांदणी चौकात आठ रॅम्पसह मुख्य रस्ता बांधला. परिणामी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मिटला. या मार्गावरून दररोज सुमारे ५० हजार वाहनांची वाहतूक होते. पादचारी पूल नसल्याने मोठी गैरसोय होते. शिवाय रस्ता ओलांडणे जिवावर बेतणारे ठरते.

हे लक्षात घेऊन प्राधिकरणातर्फे पादचारी पूल बांधण्यात येत आहे. यासाठी सुमारे सहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईला जाणारी बस पकडण्यासाठी अथवा रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या नागरिकांसाठी पादचारी पूल होणे खूप फायदेशीर ठरणार आहे.

चांदणी चौकात पादचारी पुलास मेट्रोचा पूल जोडण्याचा प्रस्ताव होता; मात्र त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पादचाऱ्यांच्या हिताचा विचार करत कामाला सुरवात केली आहे. दोन महिन्यांत पूल बांधून तयार होईल.

- अंकित यादव, उप-व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे

वनाज ते चांदणी चौक असा मेट्रोच्या मार्गाचा विस्तार प्रास्तावित आहे. चांदणी चौकातील पुलाच्या कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा झाली आहे. लवकरच बैठकही होणार आहे.

- हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक (जनसंपर्क), मेट्रो