Pune City
Pune City Tendernama
पुणे

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! कर्वेरोडवरून आज 'ती' नगररोडला जाणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे मेट्रोचा (Pune Metro) विस्तार आता आणखी दोन स्थानकांपर्यंत होणार आहे. सोमवारी (ता. २७) दुपारी चार वाजता सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक दरम्यान मेट्रोची चाचणी होणार आहे. यात मंगळवार पेठ स्थानक व पुणे स्थानक असे दोन स्थानक असून, त्यावर मेट्रोची धाव होणार आहे. यानंतर आठ ते दहा दिवसांत वनाज ते रूबी हॉल मार्गिकेचे ‘सीएमआरएस’चे निरीक्षण होईल. रेल्वे सुरक्षा आयुक्त हे ही चाचणी करतील. त्यानंतरच हा सेक्शन प्रवाशांच्या सेवेत खुला होईल, मेट्रोचा विस्तार रुबी हॉलपर्यंत होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाज स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू झाली. लवकरच फुगेवाडी स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक-रुबी हॉल स्थानक ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू केली जात आहे. मार्गिका सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चाचणी आता केली जात आहे.

सोमवारी दुपारी चार वाजता सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक-मंगळवार पेठ (RTO) - पुणे रेल्वे स्थानक - रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेतली जाईल. यावेळी मेट्रोचा वेग ताशी १० किमी इतका असेल. त्यानंतर हळूहळू चाचणीचा वेग वाढविला जाईल. पुणे मेट्रोची क्षमता ताशी ९० किमी वेगाने धावण्याची आहे. जेव्हा पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होईल तेव्हा मेट्रो ताशी ९० किमीच्या वेगाने धावेल.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गीकेवर मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल अशी महत्त्वाची स्थानके आहेत. यामुळे मेट्रोने आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहाँगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जात आहे. मेट्रो सुरू होत असल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होत आहे. पुणे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्याने रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेता येईल. मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटावर जाणे सहज शक्य होईल.

सोमवारी गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गिकेची चाचणी होणार आहे. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गिकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो