Pothole
Pothole Tendernama
पुणे

Pune: काम आहे घरचं, पुन्हा होऊ द्या खर्च! 15 कोटींच्या टेंडरला...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असताना भर पावसाळ्यात महापालिकेने (PMC) खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही रस्त्यात खड्डे कायम आहेत. त्यातच आता पुढील वर्षभर शहरातील खड्डे बुजविणे, चेंबर समपातळीत आणणे, सुशोभीकरण करणे अशा देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी २० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे. त्यापैकी तब्बल १५ कोटी रुपयांचे टेंडर मान्य केली आहेत. त्यामुळे आता तरी रस्ते चांगले होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट केल्याने महापालिका आयुक्तांनी १३ ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकले तर २४ शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तरीही अनेक मोठे ठेकादार या कारवाईतून सुटल्याचा आरोप प्रशासनावर होत आहे.

शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी पथ विभागाने १२ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय टेंडर काढली आहेत. यामध्ये पाणी पुरवठा, मलःनिसारण, गॅस वाहिनी, वीज वाहिनी तसेच केबल खोदाईचे रिइन्सटेटमेंट करणे, चेंबर समपातळीवर आणणे अशी कामे केली जाणार आहेत. १५ पैकी ९ क्षेत्रीय कार्यालयांचे प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केले आहेत. उर्वरित प्रस्ताव पुढील एक-दोन आठवड्यांमध्ये मंजूर होणार आहेत. शहरातील प्रमुख रस्ते व समाविष्ट गावांतील रस्त्यांचे रिसर्फेसिंग (पुन्हा नव्याने डांबरीकरण) करण्यासाठी तीन कोटी ६२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या टेंडरला आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली.

सुशोभिकरणावरही मोठा खर्च

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या १२ रस्त्यांना व्हीआयपी रस्ता म्हणून मान्यता दिली आहे. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्ती व सुशोभिकरणावर दरवर्षी मोठा खर्च केला जातो. त्यापैकी दुभाजक, दुरुस्त, पेंटीं, थर्मोप्लास्टिक पेंट, साइन बोर्ड, कब्र स्टोन, पेडस्ट्रीयन क्रॉसिंग या कामासाठी टेंडर मान्य केल्या आहेत. १२ पैकी नेहरू रस्ता, खंडुजीबाबा चौक ते पौड फाटा, खडीमशीन चौक ते येवलेवाडी, शंकरशेठ रस्ता, नगर रस्ता, स्वारगेट ते कात्रज-सातारा रस्ता, बिबवेवाडी मुख्य रस्ता, बावधन मुख्य रस्ता या रस्त्यांच्या टेंडर मंजूर केल्या आहेत. उर्वरित रस्त्यांची टेंडर प्रक्रिया सुरू आहे.

या रस्त्यांचे होणार सुशोभीकरण...

लक्ष्मी -४१.६९ लाख

संगमवाडी रस्ता -३०.४८ लाख

नेहरू रस्ता - ३५.०६ लाख

खडीमशीन चौक ते येवलेवाडी - २६.२८ लाख

खंडोजीबाबा चौक ते पौड फाटा - २६.९६ लाख

शंकरशेठ रस्ता - २८.२४ लाख

नगर रस्ता - २६.०६ लाख

स्वारगेट ते कात्रज सातारा रस्ता - २५.६९ लाख

बिबवेवाडी मुख्य रस्ता - २६.२३ लाख

बावधन मुख्य रस्ता - २७.६२ लाख

टेंडर चार, पण रक्कम एकच

कार्यकारी अभियंता झोन क्रमांक १ व २ (सिंहगड कात्रज व कोंढवा-वानवडी), कार्यकारी अभियंता झोन क्रमांक ३ व ४ (सर्व पेठा व हडपसर मुंढवा), कार्यकारी अभियंता झोन क्रमांक ५ व ६ (बाणेर-बालेवाडी व कोथरूड-वारजे) आणि समाविष्ट गावांमध्ये रस्ते रिसर्फेसिंग करण्यासाठी स्वतंत्र टेंडर काढले आहेत. त्यासाठी ज्या ठेकेदारांना काम दिले ते ठेकेदार वेगवेगळे आहेत. पण चारीही टेंडरची रक्कम ८८ लाख १२ हजार ६२२ अशी एकच आहे. त्यामुळे रस्ते रिसर्फेसिंगच्या कामाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.