ST Bus Stand - MSRTC
ST Bus Stand - MSRTC Tendernama
पुणे

Pune: आरामदायी प्रवासासाठी MSRTCने केलेले 'हे' बदल पाहिलेत का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : हिरव्या व पांढऱ्या रंगातील हिरकणी बस सर्वांना माहिती आहे, पण तिची ही ओळख आता कालबाह्य होणार आहे. कारण, एसटी प्रशासनाने हिरकणीच्या रंगासह प्रवासी सुविधेत मोठा बदल केला आहे.

उद्‌घोषणेपासून पॅनिक बटनपर्यंत सर्वप्रकारची सुविधा प्रवाशांना नव्या हिरकणीत मिळणार आहे. विशेष म्हणजे बसची आसनक्षमताही वाढवली आहे. एसटी महामंडळाच्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत दोनशे हिरकणींची बांधणी सुरू असून, दोन महिन्यांत त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

एसटी प्रशासनाने पहिल्यांदाच हिरकणीचे रूप बदलले आहे. बसचा रंग पांढरा व गुलाबी केला आहे. दापोडीतील कार्यशाळेत दोनशे नव्या बसची बांधणी केली जात आहे. यापैकी २० गाड्यांचे काम पूर्ण झाले असून, काही आगारांतून वाहतूकही सुरू झाली आहे. जसजशा गाड्या तयार होतील, तसतशा राज्यातील सर्वच विभागांना देण्यात येणार आहेत.

नव्या हिरकणीची आसनक्षमता ३५ वरून ४५ केली आहे. ॲल्युमिनिअमचा पत्रा बदलून ‘एमएस’चा (माइल्ड स्टील) वापर करण्यात येत आहे. यामुळे बस खड्ड्यातून गेली तरी पाठीमागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांना हादरा बसणार नाही.

वैशिष्ट्ये काय?

- बसच्या पाठीमागील चाकास एअर सस्पेंशन

- आत गडद चॉकलेटी, लाइट चॉकलेटी व ऑफ व्हाइट अशा तीन रंगसंगती

- छत, हॅट रॅक (समान ठेवण्याची जागा) आणि सीट यांना एकच रंगसंगती

- आसनाजवळ मोबाईल चार्जिंगची सुविधा

- वाहकाला सर्वांत पुढे स्वतंत्र आसन आणि जवळच तिकीट मशिन चार्जिंगची सोय

- चालक किंवा वाहकाला प्रवाशांना काही सूचना द्यायच्या असल्यास उद्‌घोषणा प्रणाली विकसित

- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणची सोय

लालपरीसह हिरकणीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात हे लक्षात घेऊन आवश्यक बदल केले आहेत. यात सरकते, आतून उघडणारे व बंद होणारे दरवाजे दिले आहेत.

- दत्तात्रेय चिकुर्डे, व्यवस्थापक, दापोडी मध्यवर्ती कार्यशाळा, राज्य परिवहन महामंडळ